मुंबई : भारताची अग्रगण्य डिजिटल वैद्यकीय आणि आरोग्यसेवा उपाययोजना पुरवठादार कंपनी जेनवर्क्सने प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा सहज आणि माफक दरांत उपलब्ध करण्याच्या आपल्या कामाची ९ वर्षे यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. बेंगळुरूमध्ये ‘ये दिल मांगे मोअर’ या विषयसूत्राभोवती गुंफलेल्या एका भव्य सोहळ्यामध्ये कंपनीने आपला ९वा वर्षपूर्ती सोहळा साजरा केला. या प्रसंगाच्या औचित्याने जेनवर्क्सच्या अधिकारीवर्गाने जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि कंपनीचा पोर्टफोलिओ विस्तारण्याच्या हेतूने केलेल्या विविध धोरणात्मक पार्टनरशिप्सची घोषणा केली.
जेनवर्क्सचे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस गणेश प्रसाद म्हणाले, ‘जीईसाठी वितरण यंत्रणा उभारण्याच्या हेतूने आणि प्रमाण वैद्यकीय साधन सुविधांची कमतरता असलेल्या ठिकाणी वैद्यकीय सेवा परवडणाऱ्या दरांत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जेनवर्क्सची निर्मिती करण्यात आली. सुरुवातीच्या काळात आम्ही लवकरात लवकर रोगनिदान आणि आजारांचा प्रतिबंध यावर प्रभाव टाकू शकतील अशा उपाययोजनांसाठी आमच्या पोर्टफोलिओची उभारणी आणि विस्तार केला. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही एक ग्राहक-केंद्री संस्था म्हणून आपली भूमिका नव्याने घडविली आहे. बदलांना चालना देण्यासाठी आपले काम अधिक परिणामकारक होण्याच्या दृष्टीने कंपनीला महिलांचे स्वास्थ्य, अतिदक्षता, रिनल आजारांची देखभाल आणि कर्करोगाशी निगडित देखभाल या क्षेत्रांमध्ये आपले कार्यक्षेत्र विस्तारावे लागेल, हे जेनवर्क्सने ओळखले आहे.’
कंपनीने काही भागीदारीची घोषणा केली आहे. ब्राऊनडव्ह हेल्थकेअर आणि रिनॅलिक्स या रिनल अर्थात किडन्यांच्या आरोग्याशी निगडित सेवा देणाऱ्या कंपन्यांशी जेनवर्क्सने भागीदारी केली आहे. अगदी कानाकोपऱ्यातील ग्राहकांपर्यंत डायलिसिस सेवा पोहोचविणे शक्य व्हावे, हा या पार्टनरशीप्सचा हेतू आहे. याखेरीज जेनवर्क्सने क्रिटिकल केअर होप, वैद्यकीय उपकरणांची निर्मिती करणारी पॅनाशिया मेडिकल टेक्नोलॉजीज आणि कार्किनोज हेल्थकेअर या तंत्रज्ञानावर भर देणाऱ्या ऑन्कोलॉजी मंचाशीही भागीदारी केली आहे.