महाराष्ट्रातील कुशल कामगारांना जर्मनीतील बाडेन-वुर्टेम्बर्ग राज्यात आमंत्रित करणारी ‘लँड हिअर’ मोहीम…

मुंबई: जर्मनीच्या बाडेन-वुर्टेम्बर्ग राज्याने आपली ‘लँड हिअर’ ही मोहीम महाराष्ट्रात सुरू केली आहे. बाडेन-वुर्टेम्बर्ग हे जर्मनीतील वायव्येकडील राज्य चैतन्यशील, भक्कम आर्थिक पायावर उभे असलेले आणि सुंदर नैसर्गिक देखावे व सक्रिय सांस्कृतिक जीवन यांनी समृद्ध असून तिथे महाराष्ट्रातील कुशल कामगारांना आकर्षित करुन विविध रोजगार संधी देणे, हे या मोहिमेमागील उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र व बाडेन-वुर्टेम्बर्ग या दोन राज्यांतील गेल्या अनेक दशकांच्या सहकार्यावर आधारित ही मोहीम परस्पर संबंध अधिक भक्कम करेलच, परंतु जर्मनीतील कुशल कामगारांच्या वाढत्या गरजेचीही पूर्तता करेल.

बाडेन-वुर्टेम्बर्ग आणि महाराष्ट्रातील संबंध दशकानुदशके भरभराटीला आले असून त्यांची उभारणी परस्पर आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक सहकार्यावर झाली आहे. वर्ष १९६८ पासून बाडेन-वुर्टेम्बर्ग राज्याची राजधानी स्टुटगार्टने मुंबईसमवेत सिस्टर-सिटी पार्टनरशिप सहयोग राखला आहे. या सहयोगाचा विस्तार वर्ष २०१४ मध्ये झाला आणि या राज्याचे तंत्रज्ञान केंद्र कार्लस्रुहे आणि पुणे यांच्यात करार झाला. पाठोपाठ वर्ष २०१५ मध्ये दोन्ही राज्यांमध्ये औपचारिक सहयोगही स्थापित झाला.

यंदा सुरवातीला दोन्ही राज्यांनी कुशल कामगार भर्ती व व्यावसायिक प्रशिक्षण यात सहकार्याच्या हेतूने उचित स्थलांतर प्रथांबाबत परस्पर बांधिलकी ठळक करणाऱ्या एका संयुक्त जाहीरनाम्यावर सह्या केल्या. कामगार भरती प्रयत्नांना चालना देण्यासाठी पुण्यात एका सेवा कक्षाची स्थापना करण्यात आली असून महाराष्ट्र सरकारही स्टुटगार्टमध्ये एक प्रतिनिधी कार्यालय उघडत आहे.

यासंदर्भात बाडेन-वुर्टेम्बर्गचे मंत्री व स्टेट चॅन्सेलरीचे प्रमुख फ्लोरियन स्टेगमन म्हणाले, ‘हे सहयोग अशा समृद्ध द्विपक्षीय संबंधांचा पाया आहेत, ज्यांनी दोन्ही राज्यांना आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या व सांस्कृतिकदृष्ट्या मजबूत बनवले आहे. ‘लँड हिअर’ मोहिमेद्वारे महाराष्ट्रातील कुशल व्यावसायिकांना बाडेन-वुर्टेम्बर्गच्या मनुष्यबळात सहभागाचे आमंत्रण देऊन हे संबंध अधिक दृढ करण्याचा आमचा हेतू आहे.’

बाडेन-वुर्टेम्बर्गला ‘द लँड’ असेही संबोधले जाते. हे राज्य मर्सिडीस-बेंझ, बॉश, एसएपी व पोर्श यासारख्या जागतिक ख्यातीच्या कंपन्यांचे माहेरघर असून या कंपन्यांही विविध उद्योगांत मुबलक संधी देऊ करत ‘लँड हिअर’ मोहिमेशी जोडल्या गेल्या आहेत. या राज्याची लोकसंख्या १.१० कोटी असून ते परंपरा व अभिनवता यांचे अनोखे मिश्रण म्हणून ओळखले जाते व माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, निर्मिती, आरोग्यसुरक्षा आदी क्षेत्रांचे आघाडीचे केंद्र बनले आहे.

फ्लोरियन स्टेगमन पुढे म्हणाले, की आम्हाला ‘द लँड’चा परिचय आंतरराष्ट्रीय व्यावसायिकांना करुन द्यायचा असून भवितव्याला आकार देण्यासाठी आमच्याबरोबर सहभागी होण्यासाठी त्यांना प्रेरित करायची इच्छा आहे. ‘लँड हिअर’ मोहिमेतून आम्ही या राज्यात देत असलेल्या व्यावसायिक संधी व जीवनमानाचा दर्जा ठळक होत आहे.

बाडेन-वुर्टेम्बर्ग राज्यात याआधीच २०,००० भारतीय व्यावसायिक काम करत असून ते प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान, धातू व विद्युत उद्योगात कार्यरत आहेत. हा तरुण व चैतन्यशील भारतीय समुदाय वेलकम सेंटर्ससारख्या स्थानिक साधनसामग्री व सुविधांशी उत्तम जोडला गेला आहे. ही केंद्रे व्यावसायिक व त्यांच्या कुटुंबियांचा जर्मन समाजाशी परिचय घडवून देण्याच्या प्रक्रियेत सहकार्य करतात. ‘लँड हिअर’ मोहीम या पायाचा विस्तार करुन या प्रदेशाला महाराष्ट्रातील बुद्धिमान मनुष्यबळाचे आकर्षण केंद्र बनवण्याचा हेतू बाळगून आहे. भारत झपाट्याने आर्थिक विकास अनुभवत आहे परंतु महाराष्ट्रातील सध्याच्या नोकरीच्या संधी वाढत्या संख्येने कुशल व्यावसायिकांना सामावून घेऊ शकत नाहीत. ‘लँड हिअर’ मोहीम अशा व्यक्तींना उत्तम करिअर घडवण्याची उत्कृष्ट संधी पुरवते व बाडेन-वुर्टेम्बर्गमधील माहिती तंत्रज्ञान, स्टेम, ऊर्जा व आरोग्यसुरक्षा क्षेत्रांत कुशल मनुष्यबळाची टंचाई जाणवणाऱ्या कंपन्यांचाही फायदा करुन देते. द लँड हा भाग स्थलांतरितांसाठी कामाचे अनुकूल वातावरण पुरवतो. हा युरोपातील आघाडीच्या अर्थव्यवस्थांपैकी असून करिअरमधील प्रगती, उत्कृष्ट वेतनमान व जीवनाच्या उच्च दर्जासाठी प्रसिद्ध आहे. येथे सामाजिक सुरक्षितता, राज्याने अनिवार्य ठरवलेले मूळ वेतनमान, आदर्श वर्क-लाईफ प्रमाण, पगारी रजा, मातृत्व/पितृत्व रजा ही उत्तम वैशिष्ट्ये आहेत. बाडेन-वुर्टेम्बर्गमध्ये उच्च गुणवत्तेची सरकारी विद्यापीठे व संशोधन संस्था असून तेथे कमीतकमी शुल्क अथवा शून्य सत्र शुल्क आकारले जाते. ब्लॅक फॉरेस्ट, हायडेलबर्ग आणि स्टुटगार्टसारखी आकर्षक सांस्कृतिक व निसर्गरम्य स्थळे येथे आहेत.

स्थलांतरितांबाबत उचित निकषांबाबत आम्ही कटिबद्ध असल्याने हा सहयोग दोन्ही राज्यांसाठी फायदेशीर असेल, असे सांगून फ्लोरियन स्टेगमन म्हणाले, की महाराष्ट्र सरकारही या सहयोगाकडे त्यांच्याकडील कुशल कामगारांच्या जास्त पुरवठ्यावरील पर्याय म्हणून पाहात आहे. या उपक्रमामुळे भारतात बुद्धिमान व्यक्तींच्या स्थलांतराची (ब्रेन ड्रेन) समस्या उद्भवणार नाही तर उलट संतुलित विकास घडून येईल.”

बाडेन-वुर्टेम्बर्ग व महाराष्ट्रातील दृढ सहसंबंधांमुळे ‘लँड हिअर’ मोहीम कुशल भारतीय व्यावसायिकांना युरोपमधील सर्वाधिक अभिनव प्रदेशांपैकी असलेल्या ठिकाणी करिअरच्या नव्या आकर्षक संधी खुल्या करण्यासाठी सज्ज आहे. हा पुढाकार वैशिष्ट्यपूर्ण व्यावसायिक प्रगतीच्या संधी देईल आणि महाराष्ट्र व बाडेन-वुर्टेम्बर्ग या दोन्ही राज्यांतील निरंतर सहयोग अधिक भक्कम बनवेल.