शिवकल्याण राजासाठी आपण ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ म्हणतो, ते का म्हणतो. याचं मूर्तिमंत वास्तव दर्शन घडवणारा ‘सुभेदार’ तान्हाजी मालुसरे चित्रपटाचं वर्णन करावं लागेल. ‘वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, वेडी माणसेच इतिहास घडवतात,’ हे स्वराज्य निर्मितीचं आणि जाज्वल्य शौर्याचे ‘सुभेदार’ तान्हाजी मालुसरे ! आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे निष्ठा, त्याग आणि बलिदानानं मिळवलं गेलेलं आहे. हे स्वातंत्र्य टिकवणं, हे आपलं कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी प्रत्येक शिलेदार घडवला आणि हे स्वराज्य घडत असताना त्या शिलेदारासह त्याचं कुटुंबही त्या स्वराज्याचं भाग बनलं. त्या रयतेचं दायित्व स्वीकारून त्याची जबाबदारीही छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली. प्रत्येकाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांना देवाचं स्थान आहे आणि शत्रूही त्यांच्या पराक्रमाचे गोडवे गायचा, हे इतिहासातून आपण पाहिलं आहे. हा रोमांचकारी इतिहास लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर याने मोठ्या पडद्यावर ताकदीनं साकारला आहे.
‘कोंढाणा’ किल्ल्याचं महत्त्व आणि स्वराज्याच्या जडणघडणीत तान्हाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांना भेटले. त्यांची स्वराज्याच्या कार्यातील युद्धकुशलता, धोरणं, डावपेच, व्यवस्थापन आणि प्रशासकीय नीतीचं दर्शन चित्रपटातील खोली अधोरेखित करतात. चित्रपटात नाती-नातेसंबध, जीवाला जीव देणारी माणसं, भावनिक बंध हे डोळ्याच्या कडा चटकन ओल्या करून जातात. छायाचित्रीत करण्यात आलेले युद्धप्रसंग आणि लढाई रोमांचकारी ठरते. ऐतिहासिक घटना आणि घडामोडी ज्या पद्धतीनं मांडल्या आहेत, त्यानं वास्तव घटनेचं प्रतिबिंब मनावर स्वराज्याची मोहोर उमटवतं. ‘कोंढाणा’ किल्ला मिळण्याआधी तान्हाजी मालुसरे यांची स्वराज्याच्या कार्यासाठी निवड कशी झाली ? त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांशी नातं कसं होतं ? रयतेची स्थिती आणि स्वराज्यासाठी घडवलेली माणसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका शब्दावर प्राणार्पण करण्यासाठी का तयार व्हायची ? जनागराडीणच्या शब्दाचं मोल स्वराज्यासाठी किती महत्त्वाचं होतं ? रयत, मावळे, सरदार, सुभेदार, कुटुंबकर्ता यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज कसे होते… ऐतिहासिक शिवकालाचं सुवर्ण पान जाणून घेण्यासाठी ‘सुभेदार’ हा चित्रपट पहावाच !
‘सुभेदार’ चित्रपटात मुख्य भूमिकेत असणारे तान्हाजी मालुसरे (अजय पूरकर) यांनी चोख भूमिका बजावली आहे. भगव्या ध्वजाखाली सूर्याजी (अभिजीत श्वेतचंद्र) भाव खाऊन गेला आहे. हिरोजी इंदुलकरनं (सौमित्र पोटे) पार पाडलेली भूमिका हृद्यस्पर्शून जाते, त्यानं हा पहिल्यांदाच अभिनय केला असला तरी ते जाणवत नाही. चित्रपटातील तांत्रिक बाजू आणि गीते जबाबदारीनं सांभाळली आहेत. ऐतिहासिक भूमिकेत आऊसाहेब (मृणाल कुलकर्णी) छत्रपती शिवाजी महाराज (चिन्मय मांडलेकर), शेलार मामा (समीर धर्माधिकारी), सावित्री (स्मिता शेवाळे), पार्वतीबाई (उमा सरदेश्मुख), रायबा (अर्णव पेंढरकर), यशोदा (शिवानी रांगोळे), येसाजी कंक (भूषण शिवतरे), मोरोपंत (श्रीकांत प्रभाकर), बाजी जेधे (बिपीन सुर्वे), जनागराडीण (अलका कुबल), सोयराबाई (नुपूर दैठणकर), शेलार (राजदत्त), शेलार मुलगी (ऐश्वर्या शिधये), पीलाजी नीळकंठ (संकेत ओक), बाजी पासलकर (सुनील जाधव), जानोजी (मंदार परळीकर), जीवा (विराजस कुलकर्णी), रंभाजी (अजिंक्य ननावरे), उदयभान (दिग्विजय रोहिदास), कुबादखान (रीषी सस्केना),अचलसिंह (ज्ञानेश वाडेकर), केसर (मृण्मयी देशपांडे), बहिर्जी (दिग्पाल लांजेकर), विश्वास (आस्ताद काळे), नवलाजी (पूर्णानंद वाडेकर) यांनी ऐतिहासिक भूमिकेला न्याय दिला असून ते उठून दिसतात.
शिवराज अष्टकातील शिवकालीन इतिहास हा नवीन पिढीनं समजून उमजून आणि जाणून घ्यावा. स्वराज्य, स्वधर्म, स्वभाषा आणि स्वराष्ट्रच्या पुनरुत्थानाचा ऐतिहासिक मौल्यवान ‘कोंढाणा’ हा रत्नजडीत ‘सुभेदार’ प्रत्येकानं पाहावा, असाच आहे. ‘सुभेदार’ चित्रपट पाहिल्यास आपल्याला हिंदवी स्वराज्याचे मोल कळेल.
लेखक-दिग्दर्शक : दिग्पाल लांजेकर
प्रस्तुकर्ते: ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट
निर्मिती: राजवारसा प्रोडक्शन्स, मुळाक्षर प्रोडक्शन्स प्रा.लि, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन्स
निर्माते: प्रद्योत पेंढरकर, अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड
– विनित शंकर मासावकर