अस्तित्व‘पारंगत सन्मान’गौरव एकांकिकांचा!

मुंबई : रंगभूमीचा पाया समजला जाणाऱ्या ‘एकांकिका’ या नाट्यप्रकारात मराठी रंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग सातत्याने होत असतात,या प्रयोगांचे मूल्यमापन एकांकिका स्पर्धांच्या माध्यमातून होत असते. ‘स्पर्धा’ हा शब्द आला कि टोकाचा संघर्ष हा अपरिहार्यच. त्यामुळे एकांकिका क्षेत्रातल्या सृजनशील मंडळीमध्ये एकप्रकारचा दुरावा निर्माण होतो, वर्षभरातल्या सर्वोत्तमांच्याही स्पर्धा भरवल्या जातात पण तिथे ही दुफळी अधिकच वाढते.या परिस्थितीचा विचार करून या सर्व नव्या दमाच्या रंगकर्मींना एकत्र आणून स्पर्धेशिवाय त्यांच्या वर्षभरातल्या कामगिरीचा खेळीमेळीच्या वातावरणात आढावा घ्यावा या हेतूने ‘अस्तित्व’ या मुंबईतल्या प्रयोगशील नाट्यसंस्थेतर्फे एकांकिका क्षेत्रातल्या गुणवत्तेचा गौरव करण्यासाठी अस्तित्व आयोजित मोरया इव्हेंटस् अँड एंटरटेनमेंट सहआयोजित ‘आयरिस प्रॉडक्शन्स पारंगत सन्मान -२०२३’ चे आयोजन केले जाते.

विशेष म्हणजे २००९ पासून सुरु असलेल्या या पुरस्कारांवर नाव कोरणारी सर्वच मंडळी चित्रपट,मालिका, नाट्यक्षेत्रात पारंगत ठरली आहेत. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात सादर झालेल्या एकांकिकांमधून सर्वोत्कृष्ट एकांकिका, लेखन, दिग्दर्शन, अभिनय, प्रकाशयोजना, नेपथ्य आणि संगीत असे पुरस्कार खुल्या आणि महाविद्यालयीन अशा दोन गटांत देण्यात येतील.

यंदा आयरिस प्रॉडक्शन्स पारंगत सन्मान संध्येचे आयोजन शनिवारी २५ फेब्रुवारीला प्रभादेवीच्या पु.ल.देशपांडे कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये करण्यात आले आहे. या ‘आयरिस प्रॉडक्शन्स पारंगत सन्मान -२०२३’ पुरस्कारांसाठी दि. ०१ फेब्रुवारी २०२२ ते ३१ जानेवारी २०२३ दरम्यान प्रथम, द्वितीय, तृतीय, लक्षवेधी पुरस्कार प्राप्त एकांकिका तसेच वैयक्तिक स्वरूपात पारितोषिक प्राप्त कलावंत आणि तंत्रज्ञ पात्र असतील. या पुरस्कारांचे प्रवेश अर्ज ई-मेल किंवा व्हॉट्स अॅपद्वारे उपलब्ध पाठवण्यात येतील. अधिक माहितीसाठी व्हॉट्स अॅप संपर्क – ९०८२६३३२८८. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक शनिवार, ४ फेब्रुवारी २०२३ आहे. पुरस्कारांची नामांकने १८ फेब्रुवारी २०२३ रोजी घोषित होतील.