कैद्यांच्या पुनर्वसनाचा ध्यास घेतलेले रामचंद्र प्रतिष्ठान !

एखाद्या गुन्ह्यात तुरुंगवासाची शिक्षा होते, तेव्हा अंधकारमय आयुष्याची कल्पनाच आरोपीच्या मनाला पोखरत जाते. शिक्षेचा कालावधी संपून कारागृहातूनबाहेर पडल्यानंतरही अवहेलना, बहिष्कृत होण्याची भीती त्याला छळते. त्यामुळे तो नाउमेद होतो आणि आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याऐवजी पुन्हा गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता अधिक असते. मात्र, कैद्यांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. रागाच्या भरात, नकळत किंवा अन्य कारणांमुळे हातून गुन्हा घडल्याने शिक्षा झाल्यानंतर त्यांना सुधारण्याची संधी द्यायला हवी. खरे तर ती तुरुंगातूनच सुरू होते. ती ओळखून अशोक शिंदे आणि नयना शिंदे या दाम्पत्याने कैद्यांच्या पुनर्वसनाचा अवघड मार्ग निवडला. त्यातूनच दादर येथे रामचंद्र प्रतिष्ठान ही संस्था आकाराला आली.

IMG 8976RP4505

काही वर्षांपूर्वी रागाच्या भरात केलेल्या कृत्याची शिक्षा भोगून आलेल्या कोल्हापूरमधील एका तरुणाची झालेली वाताहत पाहून शिंदे दाम्पत्य अस्वस्थ झाले. मुळात निव्र्यसनी असलेला हा तरुण पुन्हा समाजात सन्मानाने उभे राहता न आल्यामुळे व्यसनाधीन झाला होता. दुसऱ्या एका प्रकरणात गावातील वादविवादांमुळे शिक्षा भोगावी, लागलेल्या एका गृहस्थाला गावाने बहिष्कृत केले. अशा घटनांमुळे कैद्यांच्या पुनर्वसनावर काम करण्याचा निश्चय शिंदे दाम्पत्याने केला.

मुंबई, येरवडा, ठाणे, तळोजा, नाशिक रोड, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, अमरावती ही सर्व मध्यवर्ती कारागृहे, रत्नागिरी विशेष कारागृह, भायखळा, अलिबाग, सातारा, सोलापूर, लातूर, नांदेड या कारागृहांमधून हजारो कैद्यांना संस्थेच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले जाते. या माध्यमातून आतापर्यंत २७ हजारांहून अधिक पुरुष आणि महिला कैदी विविध उपक्रमांमध्ये सहभागी झाले आहेत.

IMG 8976RP4502
IMG 8976RP4503

कौशल्य विकास अभ्यासक्रमांच्या प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन आणि गरजूंसाठी प्रशिक्षण शुल्क व्यवस्था, रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न तसेच स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्यांना शासकीय योजनांचे मार्गदर्शन आणि आवश्यक पूर्ततेसाठी सहकार्य, मनोबल वाढीसाठी समुपदेशन आणि व्यक्तिमत्त्व विकास शिबिरांचे आयोजन संस्थेमार्फत करण्यात येते. त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक सामग्री तसेच शिक्षण शुल्कांसह आवश्यक खर्चाची व्यवस्था, मोफत कायदेशीर सल्ला मसलत, मोफत आरोग्य तपासणी, त्यांच्या पाल्यांच्या वैवाहिक सोहळ्यासाठी साहाय्य, व्यक्तिगत समुपदेशन आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन, शेती करणाऱ्यांना आधुनिक कृषी तंत्राचे मार्गदर्शन मिळवून देण्यात येते. तसेच विविध पुस्तिकांचे वाटप, चित्रकला, हस्तकला, शिवणकला, मूर्तिकाम, टंकलेखन तसेच अन्य कलांमध्ये पारंगत असलेल्यांना रोजगार मिळण्यासाठी मदत केली जाते. कारागृहातून सुटल्यानंतर स्थिरस्थावर झालेल्यांना इतरांच्या पुनर्वसनासाठी प्रोत्साहन दिले जाते.

सातारा आणि कोल्हापूर येथील काही कैद्यांना सुटकेनंतर आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. तसेच शेती तज्ज्ञांकडून मार्गदर्शन उपलब्ध करून दिल्याने सध्या ही मंडळी उत्तम शेती करत आहेत. कोल्हापूर येथील एका कैद्याची मुलगी लहान असताना तो कारागृहात आला. सुटका झाली त्यावेळी ती मोठी झाली होती. पुढे तिचे लग्न ठरले. या लग्नासाठीही संस्थेने हातभार लावला. रत्नागिरी येथील एका चित्रकार कैद्याला कला जोपासण्यासाठी संस्थेने प्रोत्साहन दिले. सध्या तो चित्रकलेद्वारे अर्थार्जन करत आहे. वाममार्गाला लागलेल्या सातारा जिल्हा कारागृहातील एका कैद्याच्या मुलाला मार्गदर्शन, समुपदेशन करून त्याच्यात सुधारणा घडविण्यात संस्थेला यश आले. नाशिकरोड येथून सुटका झालेल्या एका महिलेला मुंबईत आल्यानंतर अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शन तसेच शैक्षणिक शुल्क देण्यात आले. ठाणे येथून सुटलेल्या दोन महिलांचेही असेच पुनर्वसन करण्यात आले. अलिबाग जिल्हा कारागृहातून एका तरुणाची सुटका झाल्यानंतर संस्थेने त्याला शैक्षणिक मदत केली. आता तो मुंबईतील एका नामांकित शिक्षण संस्थेत पदवीचे शिक्षण घेत आहे. संस्थेने अनेक कैद्यांना त्यांची आवड लक्षात घेऊन, पूर्वीच्या अनुभवाच्या आधारे रोजगारही उपलब्ध करून दिले आहेत. अशी अनेक भरकटलेली आयुष्ये यासंस्थेने सावरली आहेत. हे काम अधिक परिणामकारक आणि प्रभावीपणे तसेच व्यापक स्वरूपात पुढे नेणे आवश्यक आहे.

IMG 8976RP4504

दादर येथील ‘रामचंद्र प्रतिष्ठान’ या संस्थेला पुनवर्सन केंद्र उभारण्यासाठी औरंगाबाद येथील भोसले दाम्पत्याने १४ एकर जागा उपलब्ध करून दिली. ‘या जागेवर मुलभूत सुविधा उपलब्ध कराव्या लागणार आहेत. जागेपर्यंत जाण्यासाठी पक्के रस्ते, वीज, पाणी, निवास, देखभाल, वाहन व्यवस्था, कृषी अवजारे, सामग्री, बि-बियाणे, खत आणि इतर अनेक गोष्टींची पूर्तता होणे बाकी आहे. हे पुनर्वसन केंद्र उभे करून कैद्यांना शिक्षा कालावधी पूर्ण झाल्यानंतर रोजगार मिळवून देण्यासाठी तसेच त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी संस्था सध्या कार्य करत आहे.

महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे काम होत आहे. परंतु अशा पद्धतीचे पुनर्वसन केंद्र अद्याप उभे राहिलेले नाही. ‘रामचंद्र प्रतिष्ठान’ कडून उभारले जाणारे हे राज्यातील पहिले पुनर्वसन केंद्र असेल. पुनर्वसन केंद्राच्या निर्मितीसाठी आम्ही गेली अनेक वर्षे धडपडत होतो. त्याचे फलित आता मिळत आहे. या प्रकल्पामुळे कैदी सुटका झाल्यानंतर स्वत:च्या पायावर स्वावलंबी जीवन जगू शकतील. तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतील. हे कार्य आव्हानात्मक असून त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी समाजातील विविध घटकाचा यात सक्रिय सहभाग आवश्यक आहे, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी व्यक्त केला आहे.