खेलो इंडिया युथ गेम्स २०२२-२३ मध्ये महाराष्ट्र पुरुष खो-खो संघाला सलग पाचव्यांदा विजेतेपद !

जबलपूर:खेलो इंडिया युथ गेम्स २०२२-२३ मध्ये महाराष्ट्र पुरुष खो-खो संघ सलग पाचव्यांदा विजेता ठरला आहे.युवा कर्णधार नरेंद्र कातकडे, आदित्य कुडाळे आणि निखिल यांनी सर्वोत्तम अष्टपैलू कामगिरी करत सोनेरी यशाची घोडदौड कायम ठेवली. नरेंद्रच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा खो-खो संघ पाचव्या सत्रातील खेलो इंडियामध्ये सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. यासह महाराष्ट्र संघाने आपले निर्विवाद वर्चस्व राखत सलग पाचव्यांदा विजयी होण्याचा बहुमान पटकावला आहे. महाराष्ट्राच्या संघाने अंतिम सामन्यात आज दिल्लीच्या संघाला धूळ चारली. महाराष्ट्राने ३८-२८ असा दहा गुणांच्या आघाडीने अंतिम सामना जिंकला.महाराष्ट्राचा पुरुष खोखो संघ सलग पाचव्यांदा सुवर्णपदक विजेता ठरला.

महाराष्ट्राचा महिला खो-खो संघ रौप्य पदकाचा मानकरी ठरला. महाराष्ट्र संघाला अंतिम फेरीत ओडीसा विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. ओडिसा संघाने आज महाराष्ट्र महिला खो-खो संघाची खेलो इंडिया युथ गेम्स मधील सुवर्ण यशाची मोहीम रोखली. ओडिसा संघाने अवघ्या तीन गुणांच्या आघाडीने अंतिम सामन्यात चार वेळच्या सुवर्णपदक विजेत्या महाराष्ट्र संघाचा १६-१३ ने पराभव केला. त्यामुळे जानवी पेठेच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा संघ रौप्य पदकाचा मानकरी ठरला. ओडिसा संघाने पहिल्यांदा खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये विजयी होण्याचा बहुमान पटकावला आहे.

सलग पाचव्यांदा विजेता होण्याच्या इराद्याने मैदानावर उतरलेल्या महाराष्ट्राच्या संघाने दमदार सुरुवात केली. त्यामुळे संघाला पहिल्या डावामध्ये आघाडी घेता आली. नरेंद्र याच्या नेतृत्वात खेळाडूंनी स्वरूप कामगिरी करत पहिल्या डावात १८-१७ अशी आघाडी मिळवली होती. आपले वर्चस्व राखून ठेवत महाराष्ट्राने दुसऱ्या डावातही दिल्ली संघाचा विजयाचा प्रयत्न हाणून पाडला. यादरम्यान महाराष्ट्राने २०-१८ गुणांच्या आघाडीने अंतिम सामन्यात विजय मिळवला. यादरम्यान करणार नरेंद्रने चार गडी बाद करत १:३० मिनिटे पळतीचा खेळ केला. तसेच निखिलने संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने चार गडी बाद केले.

महाराष्ट्र खो-खो संघाची गौरवशाली कामगिरी: क्रीडा आयुक्त सुहास दिवसे

मध्यप्रदेश येथील खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष खो खो संघांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. महाराष्ट्राच्या पुरुष खो-खो संघाने मिळवलेले सोनेरी यश गौरवशाली आहे. महिला संघाने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे खूप खेळ प्रकारात महाराष्ट्राला आपले वर्चस्व गाजवतात, अशा शब्दात क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी महाराष्ट्राच्या संघावर कौतुकाचा वर्षाव केला.