खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने ३८ सुवर्ण, ३४ रौप्य आणि ३१ कांस्यपदके मिळवत पदकांचे शतक केले साजरे !

● जलतरणात अपेक्षा फर्नांडिसची सुवर्ण हॅटट्रिक
● जलतरणात एकाच दिवशी चार सुवर्ण
● सायकिलंगमध्ये पूजा दानोळेचे तिसरे सुवर्ण, एकूण पाच पदके
● मल्लखांबमध्ये समीक्षा सुरडकरला सुवर्ण आणि शार्दुल जोशीला रौप्य
● कुस्तीत समृद्धि, उत्कर्ष, महादेवला रौप्य
● ज्युदोमध्ये पृथ्वीराजला रौप्यपदक
● तलवारबाजीत निखिल,अनुजाला सुवर्णपदक
● भरोत्तलनामध्ये निकिताला सुवर्ण
● कबड्डी मुली अंतिम फेरीत, मुलांना कांस्य

भोपाळ : खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने पदकांचे शतक साजरे केले आहे. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडियाच्या पाचव्या पर्वातही आपली मक्तेदारी राखली. सलग पाचव्या स्पर्धेत पदकांचे शतक ओलांडत महाराष्ट्राने या स्पर्धेतील आपले वर्चस्व सिद्ध केले. महाराष्ट्राने आता ३८ सुवर्ण, ३४ रौप्य आणि ३१ कांस्यपदके मिळवत १०३ पदकांसह आघाडी कायम राखली आहे. हरियाना, मध्य प्रदेश यांच्यात दुसऱ्या क्रमांकासाठी रस्सीखेच कायम आहे. हरियाणा २५ सुवर्ण, २० रौप्य आणि १८कांस्य अशा ६३ पदकांसह दुसऱ्या, तर मध्य प्रदेश २५ सुवर्ण, १३ रौप्य आणि २३ कांस्य अशा ६१ पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. महाराष्ट्राला बुधवारी जलतरण आणि सायकलिंगच्या सुवर्णपदकांनी बाजू भक्कम करता आली. अपेक्षा फर्नांडिसने जलतरणात आणि पूजा दानोळेने सायकलिंगमध्ये सुवर्ण हॅटट्रिक साजरी केली.

● जलतरणात अपेक्षाची सुवर्ण हॅटट्रिक
महाराष्ट्राच्या अपेक्षा फर्नांडिसने आज दोन, तर वेदांत माधवने एक सुवर्णपदक मिळवत आपली सुवर्णपदकांची संख्या वाढवली. अपेक्षाने २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात २ मिनिट ३९.८७ सेकंद अशी वेळ देत हे यश मिळविले. पाठोपाठ अपेक्षाने १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात १ मिनिट ०३.६९ सेकंद वेळ देत दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली. वेदांतने आपल्या २०० मीटर फ्री-स्टाईलच्या सुवर्णपदकात आज १५०० मीटर फ्री-स्टाईल प्रकारात बाजी मारली. त्याने १६ मिनिटे १६.७४ सेकंद अशी वेळ दिली. १०० मीट बॅक स्ट्रोक शर्यतीत प्रतिक्षा डांगीने १ मिनिट ०८.९२ सेकंद वेळ देत सुवर्णपदक मिळविले. याच प्रकारात कोल्हापूरची भक्ती वाडकर १ मिनिट ०९.२३ सेकंदासह कांस्य पदकाची मानकरी ठरली. मुलींच्या चार बाय १०० मीटर रिले शर्यतीत अनन्या नायक, दिप्ती तिलक, पलक जोशी, अपेक्षा फर्नांडिस या चमूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या चमूने ४ मिनिट ०६.७१ सेकंद अशी वेळ दिली.कर्नाटकाने ४ मिनिट ०६.१० सेकंदासह सुवर्णपदक पटकावले.

● सायकलिंगमध्ये पूजाचे पदकाचे पंचक
महाराष्ट्राची आघाडीची सायकलिंगपटू पूजा दानोळेने रोडरेस शर्यतीत २० कि.मी. अंतराची शर्यत ३६.१.७४५ सेकंदात जिंकत सुवर्णपदक मिळविले. पूजाचे या स्पर्धेतील तिसरे सुवर्ण आणि एकूण पाचवे पदक ठरले. तिने नगरच्या अपूर्वा गोरेला (३६ मिनिट ७.८३८ सेकंद) मागे टाकले. अपूर्वा रौप्यपदकाची मानकरी ठरली. पूजाने एकतर्फी वर्चस्व राखताना ताशी ३३.३१ प्रति कि.मी. वेगाने सायकलिंग केले.

● भारोत्तलानामध्ये निकिताला सुवर्ण
भारोत्तलानामध्ये (वेटलिफ्टिंग) आज तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राला निकिता कमलाकरने मुलींच्या विभागातून सुवर्ण, तर साईराज परदेशीने मुलांच्या विभागातून ७३ किलो वजन गटात कांस्यपदक मिळविले. साईराजने स्नॅचमध्ये ११५ आणि क्लिन-जर्कमध्ये १४७ असे एकूण २६२ किलो वजन उचलून कांस्य पदक मिळविले. स्नॅचमध्ये ११८ किलो वजन उचलताना दोन वेळा साईराजचा प्रयत्न अपयशी ठरला. दिल्लीच्या शिवा चौधरीने ११९ आणि १५० असे एकूण २६९ किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळविले. आसामचा प्रबल गोगोई (२६५ किलो) कांस्यपदकाचा मानकरी ठरला. त्यापूर्वी निकिता कमलाकरने ५९ किलो वजनी गटात स्नॅचमध्ये ७३ आणि क्लिन-जर्कमध्ये १०४ असे १७७ किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळविले. निकिताने स्नॅचमध्ये दुसऱ्या ७२ किलोच्या प्रयत्नानंतर तिसऱ्या प्रयत्नांत ७५ किलो वजन उचण्याचा प्रयत्न केला. पण, तो अपयशी ठरला. क्लिन-जर्कमध्ये निकिताने दुसऱ्या ९९ किलोच्या प्रयत्नांनंतर थेट ५ किलो वाढवून १०४ किलो वजन यशस्वी उचलले. हीच कामगिरी निर्णायक ठरली. कारण स्नॅचमध्ये निकिता चौथ्या क्रमांकावर राहिली होती.

● कबड्डीमध्ये मुली अंतिम फेरीत
हरजित कौरच्या खोलवर चढाया आणि तिला याशिका पुजारी, मनीषा, समृद्धीकडून मिळालेल्या सुरेख साथीमुळे महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने जगड्या हिमाचल प्रदेश संघाचे आव्हान ४४-३१ असे परतवून लावत कबड्डीत अंतिम फेरीत प्रवेश केला. विजेतेपदाच्या लढतीत महाराष्ट्राची गाठ हरियाणाशी पडणार आहे. हरियानाकडून स्पर्धेत साखळीतील पहिल्या सामन्यात महाराष्ट्राला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर हरियानाने प्रत्येक सामन्यात प्रतिस्पर्धी संघाचा अक्षरशः धुव्वा उडवून अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीत तर त्यांनी बिहारवर एकामागून एक सात लोण चढवले. यावरून त्यांच्या आक्रमकतेची कल्पना येईल. मुलांना उपांत्य फेरीत कबड्डीत हरियानाकडून ५०-३५ अशी हार पत्करावी लागली. या पराभवामुळे मुलांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

● मल्लखांबमध्ये समीक्षाला सुवर्ण
मल्लखांबमध्ये मुलींच्या विभागात समीक्षा सुरडकरने १७.३५ गुणांसह सुवर्णपदक मिळविले. याच प्रकारात महाराष्ट्राची तनुश्री जाधव १७.२० गुणांसह ब्रॉंझपदकाची मानकरी ठरली. राष्ट्रीय खेळाडू शार्दुल जोशीने पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये रौप्यपदक मिळविले. शार्दुलने वैयक्तिक ओव्हर ऑल गटात दुसऱ्या स्थानी धडक मारली. अंतिम फेरीत शार्दुलने २६.१० गुणांची कमाई केली. मात्र, त्याची कामगिरी दुसऱ्या क्रमांकाची ठरली. यजमान मद्य प्रदेशाच्या प्रणवने २६.५० गुणांसह सुवर्णपदक मिळविले. महाराष्ट्राचा ऋषभ घुबडे चौथ्या स्थानावर राहिला. त्याने २५.२५ गुणांची कमाई केली.

● तलवारबाजीमध्ये निखिल आणि अनुजाला सुवर्ण
आंतरराष्ट्रीय खेळाडू निखिल वाघ आणि अनुजा लाड यांनी तलवारबाजी (फेन्सिंग) प्रकारात सेबर पद्धतीत महाराष्ट्राच्याच श्रेयस जाधवला १५-१४ असे एका गुणाने हरवले. श्रेयस रौप्यपदकाचा मानकरी ठरला. महिलांच्या ईप्पी प्रकारात अनुजाने देखील महाराष्ट्राच्याच माहीला १५-११ असे हरवून सुवर्णपदक पटकावले. माहीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. जान्हवी जाधवला ईप्पी प्रकारात कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

● कुस्तीमध्ये समृद्धि, उत्कर्ष, महादेवला रौप्य
महाराष्ट्राच्या समृद्धि घोरपडे (४६ किलो), उत्कर्ष ढमाळ (५१ किलो) आणि महादेव (६० किलो) यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. जबरदस्त लढती करंडत अंतिम फेरी गाठणाऱ्या समृद्धिला सुवर्ण लढतीत हरियाणाच्या मुस्कानने १२-६ असे हरवले. याच गटात कांस्यपदकाच्या लढतीत तृप्तीने दिल्लीच्या ज्योती कुमारीला ४-० असे हरवले. उत्कर्षला छत्तीसगडच्या मनु यादवकडून गुणांवर मात खावी लागली. महादेवही हरियानाच्या आशिषकुमारकडून गुणांवर पराभूत झाला. याच गटात प्रणय चौधरीने उत्तर प्रदेशाच्या जुबेरला ६-५ असे हरवून कांस्यपदक मिळविले.

● ज्युदोत पृथ्वीराजला रौप्य
महाराष्ट्राच्या पृथ्वीराज चव्हाणला ५१ किलो गटात तेलंगणाच्या एल. लक्ष्मणकडून पराभव पत्करावा लागला. मुलींच्या ४० किलो वजन गटात ठाण्याच्या मिथिलाने राजस्थानच्या हिमांशी बिश्नोईला हरवून कांस्य पदक मिळविले.