‘जो जो करील तयाचे…’

• स्वयंप्रकाशी तू तारा…
• परिवर्तनाचा वाटसरू…
• परिवर्तनाचा ध्यास तू…

आज सामाजिक क्षेत्रात काम करू पाहणाऱ्या युवकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. विकसनशील म्हणवल्या जाणाऱ्या आपल्या भारतासाठी ही एक सकारात्मक बाबच म्हणायला हवी. ‘जो जो करील तयाचे…’ या पुस्तकामध्ये सामाजिक परिवर्तनाच्या वाटेकडचा ध्यास अंगीकारलेल्या अशाच एका तरुण युवा प्रशासकीय अधिकाऱ्याची कथा मांडलेली आहे.

स्पर्धा परीक्षेच्या आधारावर अचानक आयुष्यात प्रशासकीय काम करण्याची आलेली संधी, त्या कामाचा कुठलाही पूर्वानुभव नसताना सामाजिक कामाच्या प्रेरणेतून एका वेगळ्या राज्यात जाऊन काम करण्याची त्याने दाखवलेली तयारी आणि हे काम स्वीकारल्यानंतर त्या व्यवस्थेत काम करताना त्या अधिकाऱ्याला आलेल्या स्वानुभवांची ही एक मालिकाच आहे. मात्र हे अनुभव सरळ-साध्या व्यवस्थेतील कामकाजाचे भाग नसून ते जगण्या मरण्याशी संबंधित असणारे एका अपयशी सरकारी व्यवस्थेचे वास्तववादी दर्शन आहे. मराठी साहित्यातील अनुभव कथन या प्रकाराद्वारे लेखकाने अत्यंत सहज, साध्या आणि ओघवत्या शैलीत ते वाचकांसमोर मांडले आहेत.

‘स्वच्छ भारत अभियान’ ही भारत सरकारची एक प्रभावशाली योजना. मात्र ही आणि यांसारख्या असंख्य महत्त्वपूर्ण योजना प्रत्यक्षात खरंच तळागाळापर्यंत पोहोचतात का? की केवळ पक्षाची धोरणे आणि राजकीय सत्तांतराची गणिते म्हणूनच त्यांचं अस्तित्त्व मर्यादित राहतं? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आणि आपल्या व्यवस्थेच्या अविकसित राज्यांच्या मागासलेपणाची महत्त्वाची कारणं आपल्याला उत्तर प्रदेशातील मैनपुरीमधील वास्तवावर आधारित कथांमधून प्रकर्षाने दिसून येतात. या राज्यांच्या भ्रष्टाचारी व्यवस्थेची आणि सरकारी मेवा खाऊन फुलत चाललेल्या त्या सरकारी बाबूंची लक्तरे मग कशी वेशीवर खुली टांगली जातात हेही उघडपणे दिसून येते.
कैलास गिते यांच्या स्वानुभवावर आधारित असलेल्या या पुस्तकाची जसजशी एक-एक प्रकरणं पुढे सरकत जातात तशा आपल्या कल्पनांच्या कक्षा विस्तारत जातात. उत्तर प्रदेशमधील पंचायत राज व्यवस्थेमध्ये केंद्र सरकारच्या योजनेचा जिल्हास्तरीय अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी जगलेल्या आव्हानांची मालिका हळुहळू मग पुढे सरकत जाते. आव्हानात्मक परिस्थितीमध्येही व्यवस्थेत टिकून राहून काम करताना आपली कर्तव्य आणि नैतिकता यांच्याशी बांधील राहून, आपण ठरवलं तर या भ्रष्टाचारी परिस्थितीला संयमाने आणि हुशारीने कसे तोंड देऊ शकतो हे त्यांच्या कृतीतून दिसून येऊ लागते. परिणामी व्यवस्थेमध्ये राहून बदल निर्माण करू पाहणाऱ्या वाचकाच्या विचारांच्या कक्षा रूंदावतात.

नवखा अधिकारी ते गरीब आणि वंचित अशा समाजातील ३०,००० लाभार्थ्यांना त्यांचा हक्क मिळवून देणारा परिणामी त्यासाठी आपले प्राण तराजूच्या काट्यावर ठेवून लढणाऱ्या या मुत्सद्दी अधिकाऱ्याचा संपूर्ण कथेतील प्रवास रोमांचकारी आहे. मात्र खऱ्या आयुष्यात त्यांनी झेललेली ती दाहकतादेखील जशीच्या तशीच वाचकाच्या मनाला भिडते, हेही नाकारता येणार नाही.

या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये जगण्या-मरण्याच्या या अनुभवलेल्या परिस्थितीपलीकडे जाऊन लेखकाने या पुस्तकातील कथेला न्याय दिला आहे. म्हणजेच एखाद्या चित्रपटाचा एक पट पूर्ण व्हावा आणि आता पुढे काय अशा पद्धतीत त्यांनी या कथांची आखणी केलेली दिसते. त्यामध्ये मग त्या राज्यातील संस्कृती, तिथली सरकारी कामकाजाची रचना, तिथली पर्यटन स्थळं, तेथील खाद्यपदार्थ, तिथल्या माणसांचा स्वभाव, त्यांची जीवनशैली, त्यांचं जगणं या साऱ्याची प्रभावशाली गुंफण त्यांनी या कथांमध्ये केलेली आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होते. तसेच राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे सदस्य म्हणून कार्यरत असणाऱ्या मा. ज्ञानेश्वर मुळे सरांनी आणि माजी आय.ए.एस अधिकारी म्हणून कर्तव्य बजावलेल्या मा. लक्ष्मीकांत देशमुख सरांनी लिहिलेल्या प्रस्तावनांमधून या पुस्तकाचा मतितार्थ सुरुवातीलाच वाचकांच्या ध्यानी येण्यास साहाय्य होते.

या प्रवासादरम्यान तरुण अधिकाऱ्यासोबत असलेले मित्र, प्रवासाच्या एका टप्प्यावर उमललेलं प्रेम, प्रत्येक वळणावर लाभलेली काही सज्जन माणसांची त्यांना साथ आणि त्यामुळे सुखकर झालेला त्यांचा हा संघर्षाच्या मार्गावरील यशस्वी प्रवास…या साऱ्या माणूस म्हणून जगताना कामापलीकडे जाऊन आपल्या जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांचाही अगदी मनाला भिडणारा हळव्या मनाचा कोपराही लेखकांनी अलगदपणे उलगडला आहे. त्यामुळे सर्वार्थाने ही कथा आणि अधिकाऱ्याचा स्वानुभव वाचकांपर्यंत पोहोचविण्यात लेखक यशस्वी झाले आहेत.

त्यामुळे हे पुस्तक प्रशासकीय व्यवस्थेत येणाऱ्या आणि आपल्या सामाजिक व्यवस्थेत परिवर्तनाचा कल्पतरू निर्माण करू पाहणाऱ्या युवकांना येणाऱ्या काळातील एक दिशादर्शक ठरणार इतके मात्र निश्चित!

– प्राजक्ता हरदास