नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे २ उमेदवार विजयी झाल्याने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ढोल वाजवून केला आनंदोत्सव साजरा !

मुंबई : नागालँड विधानसभा निवडणुकीत टूएनसंद सदर- २ विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाचे (आठवले) अधिकृत उमेदवार इम्तिचोबा हे विजयी झाले आहेत. तसेच नागालँडच्या नोकसेन विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाचे ( आठवले) अधिकृत उमेदवार वाय. लिमा ओनेन चँग हे विजयी झाले आहेत. नागालँडमध्ये गन्ना किसान (ऊस शेतकरी) या निवडणूक निशाणीवर रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले) पक्षाच्या उमेदवारांनी निवडणूक ८ ठिकाणी लढली आणि त्यात २ उमेदवार विजयी झाले, अशी माहिती आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

नागालँडमध्ये निवडून आलेले रिपब्लिकन पक्षाचे दोन्ही आमदार नागालँडमध्ये भाजप एनडीपीपीच्या युतीला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देतील. नागालँड सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा वाटा मिळण्यासाठी आपण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि पक्षश्रेष्ठी नेत्यांना भेटणार आहे, असे रामदास आठवले यांनी आज आझाद मैदान येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आज दिनांक २ मार्चला दुपारी ३:०० वाजता रिपब्लिकन पक्ष आठवले मुंबई प्रदेशतर्फे नागालँडमध्ये आरपीआयचे २ उमेदवार विजयी झाल्याबद्दल मुंबईच्या रिपब्लिकन पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय आझाद मैदान येथे विजयी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांच्या नेतृत्वात रिपाइंच्या मुंबईतील कार्यकर्त्यांनी रिपाइंच्या मध्यवर्ती कार्यालयात फटाके वाजवून नाचून आनंद साजरा केला. या आनंद उत्साहात कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर रामदास आठवले सहभागी झाले.त्यांनी ढोल वाजवून रिपब्लिकन पक्षाच्या नागालँडमधील ऐतिहासिक विजयाचा जल्लोष साजरा केला.‘आठवलेसाहेबांच्या मेहनतीला आले फळ नागालँडने दिले आरपीआय ला बळ’चा नारा कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर,युवक आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पप्पू कागदे, स्थानिक जिल्हा अध्यक्ष संजय पवार, दयाळ बहादूर, सचिनभाई मोहिते, साधू कटके, प्रकाश जाधव, घनश्याम चिरणकर, अमित तांबे, शिरीष चिखलकर,अली चौधरी आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.