पहिली गरवारे क्लब हाऊस शरद पवार अखिल भारतीय फिडे रॅपिड रेटिंग खुल्या बुद्धिबळ स्पर्धा २०२३ चं आयोजन

मुंबई : गरवारे क्लब हाऊसच्या वतीनं दिनांक ७ जानेवारी २०२३ ला ‘पहिली गरवारे क्लब हाऊस शरद पवार अखिल भारतीय फिडे रॅपिड रेटिंग खुल्या बुद्धिबळ स्पर्धे’चं आयोजन वानखेडे स्टेडियम इथं करण्यात आलं आहे. अखिल भारतीय बुद्धिबळ स्पर्धेचं उद्घघाटन गरवारे क्लब हाऊसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सकाळी ९:०० वाजता होणार आहे. या उद्घघाटन कार्यक्रमाला फिडे जागतिक सल्लागार परिषदचे (फिडे वर्ल्ड एडव्हायजरी कौन्सिल) कार्याध्यक्ष आणि अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे माजी सचिव भरत सिंग चौहान यांच्यासह महा बुद्धिबळ असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसंच ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे आणि ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे हे या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. या स्पर्धेत भारताची युवा महिला ग्रँडमास्टर सौम्या स्वामीनाथनसह दोन आंतरराष्ट्रीय मास्टर, तीन महिला मास्टर आणि अनेक कँडिडेट मास्टर बुद्धिबळपटूं सहभागी होणार आहेत.

शरद पवार अखिल भारतीय फिडे रॅपिड रेटिंग खुल्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी देशभरातून महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आदी राज्यांतून ४०० हून अधिक प्रवेशिका दाखल झाल्या आहेत. मुंबईच्या बुद्धिबळ इतिहासात सर्वाधिक बुद्धिबळपटूंचा सहभाग असलेली ही महाबुद्धिबळ स्पर्धा असणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील विजेत्याला शरद पवार चषक आणि दोन लाख रुपयांचं पारितोषिक देऊन गौरवण्यात येईल. तसंच अन्य ४५ विजेत्यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती गरवारे क्लब हाऊसचे संचालक आणि बुद्धिबळ समितीचे अध्यक्ष मोहित चतुर्वेदी यांनी दिली.

‘आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ क्षेत्रातील गुणवत्ता जोपासण्याची ही संधी आमच्या गरवारे क्लब हाऊसला शरद पवार अखिल भारतीय फिडे रॅपिड रेटिंग खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या निमित्तानं मिळत आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो. स्पर्धेत मोठ्या संख्येनं बुद्धिबळपटूंनी भाग घेतला असला, तरी मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना आणि गरवारे क्लबची कार्यकारिणी समिती हे यशस्वीपेणे पेलत आहे,’ असं गरवारे क्लब हाऊसचे उपाध्यक्ष राज पुरोहित यांनी सांगितलं.