पहिल्या शरद पवार अखिल भारतीय फिडे जलद रेटिंग खुल्या स्पर्धेचा आंतरराष्ट्रीय मास्टर शंतनु भांबुरे ठरला विजेता

मुंबई : पहिल्या शरद पवार अखिल भारतीय फिडे जलद रेटिंग खुल्या स्पर्धेचा आंतरराष्ट्रीय मास्टर शंतनु भांबुरे विजेता ठरला आहे. आंतरराष्ट्रीय मास्टर किताब पटकावणाऱ्या २६ वर्षीय शंतनू भांबुरेने (एलो रेटिंग २१८६) साडेआठ गुण मिळवून गरवारे क्लब हाऊसतर्फे वानखेडे स्टेडियम इथं आयोजित केलेल्या पहिल्या शरद पवार अखिल भारतीय फिडे रॅपिड रेटिंग खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावलं. नऊ डावांच्या या स्पर्धेत शंतनूनं आठ विजय मिळवले, तर एक डाव बरोबरीत सोडवला. चार बुद्धिबळपटूंनी प्रत्येकी आठ गुणांची कमाई केल्यामुळं स्पर्धेचे दोन ते पाच क्रमांकाचे विजेते हे टाय ब्रेकरनुसार निश्चित करण्यात आले. यापैकी दुसरा क्रमांक आकाश दळवीनं (एलो रेटिंग २१५४), तिसरा क्रमांक शैलेश बारियानं (एलो रेटिंग १७८०) आणि चौथा कँडिडेटस मास्टर वेदांत पिंपळखरेनं (एलो रेटिंग २१८२) यांनी मिळवलं. या स्पर्धेत पाचवा क्रमांक हा २१ वर्षीय युवा बुद्धिबळपटू अंकुर गोखलेनं (एलो रेटिंग १७९९) पटकावला. याचप्रमाणे साडेसात गुण मिळवणारा देव शाह सहाव्या क्रमांकाचा मानकरी ठरला.

१५ वर्षांखालील वयोगटात मुलांमध्ये श्रेयांस सोमय्या, सुयोग वडके आणि आराव अय्यर यांनी प्रत्येकी सहा गुणांसह अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. मुलींमध्ये सारा मोदी आणि श्रीया जोशी यांनी प्रत्येकी पाच गुणांसह अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवला. हर्षिता महेश्वरीला साडेचार गुणांसह तिसरा क्रमांक मिळाला.गरवारे क्लब हाऊसच्या सदस्यांपैकी निवान शाह आणि देविका पिंगे यांनी अनुक्रमे मुले आणि मुलींच्या गटाचे पारितोषिक पटकावले. ६० वर्षांवरील ज्येष्ठांसाठीच्या वयोगटात वासावे गोवर्धन आणि लहूचंद ठाकूर यांनी प्रत्येकी सहा गुणांसह पहिले दोन क्रमांक मिळवले. अपंगांसाठीच्या गटात यश गोगटे पहिला आला, तर स्वप्नील हुळेला दुसरा क्रमांक मिळाला.वयोगट १३ वर्षे, ११वर्षे, ९वर्षे आणि ७ वर्षांखालील मुलं आणि मुली स्पर्धकातून प्रत्येकी तीन विजेते मुलं आणि मुली विजेते ठरले.

स्पर्धेतील विजेत्यांना माजी आमदार आणि गरवारे क्लब हाऊसचे उपाध्यक्ष राज पुरोहित, महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले आणि गरवारे क्लब हाऊसचे कोषाध्यक्ष मनीष अजमेरा यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.