बँक ऑफ बडोदाची अभिनेते मिलिंद सोमण यांच्यासोबत ‘ग्रीन राइड’च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा !

मुंबई : वांद्रे – कुर्ला संकुल इथं बँक ऑफ बडोदानं अभिनेते आणि मॉडेल मिलिंद सोमण यांच्यासोबत ‘ ग्रीन राइड – एक पहल स्वच्छता की ओर’ च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा केली. पर्यावरण प्रसारक आणि फिटनेस चाहते अभिनेते मिलिंद सोमण यांच्या साथीनं हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत मिलिंद सोमण सायकल आणि इलेक्ट्रिक स्कूटरवरून ८ दिवसांच्या शाश्वत प्रवासाची सुरुवात करणार आहेत. या माध्यमातून अभिनेते मिलिंद सोमण पर्यावरणस्नेही वाहनं, हरित जीवनशैली, आरोग्य आणि फिटनेसचा प्रचार करणार आहेत.

मुंबईहून १९ डिसेंबर २०२२ला १ हजार ४०० किमीच्या राइडची सुरुवात होईल आणि मंगळुरूला २६ डिसेंबर २०२२ ला त्याची सांगता होईल. या प्रवासात मिलिंद सोमण पुणे, बंगळुरू आणि म्हैसूरला भेट देणार आहेत. प्रत्येक शहरात ते बँक ऑफ बडोदाचे कर्मचारी, ग्राहक आणि त्यांच्या चाहत्यांना भेटणार असून शुद्ध हवेच्या महत्त्वाच्या संदेशाचा प्रसार करणार आहेत. शाश्वत आणि ऊर्जासक्षम वाहतूक पर्यायांचा वापर करण्यासाठी प्रत्येकानं आपल्या आयुष्यात फिटनेसला प्राधान्य द्यावं, यासाठी प्रोत्साहन देणार आहेत.

‘पर्यावरण संरक्षणामध्ये आपल्यापैकी प्रत्येकानं योगदान दिलं पाहिजे याची जाणीव वाढू लागली आहे. प्रदूषणाचे अनेक घातक परिणाम आहेत आणि शाश्वत जीवनशैलीच्या दृष्टीनं लहान पावलं टाकून आपणही हरित वातावरणासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो. ग्रीन राइडसाठी मिलिंद सोमण यांच्याशी सहयोग करताना बँक ऑफ बडोदाला प्रचंड आनंद होत आहे. आम्ही या माध्यमातून जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आणि एकत्रित कृती करण्यासाठी सर्व भारतीयांना एकत्र आणतो’, असं बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव चड्ढा सांगितलं.

‘माझा लोकांना सोपा संदेश आहे. आपल्याकडे श्वास घ्यायला शुद्ध हवाच नसेल तर एक समाज म्हणून आपण केलेली सर्व प्रगती आणि साध्य केलेली आधुनिकता व्यर्थ आहे. जर आपल्यापैकी प्रत्येकानं आपापल्या आयुष्यात बदल घडवला. म्हणजे इंधनयुक्त वाहनाऐवजी चालण्याचं-सायकल चालविण्याचं ठरवलं, रोप लावलं, रियुझ/रिसायकल तत्वाचं अनुसरण केलं, तर आपण एकत्रितपणं पर्यावरणाच्या संवर्धात योगदान देऊ शकू. गेल्या वर्षी पहिल्या ग्रीन राइडचा अनुभव, लोकांनी दाखवलेला उत्साह आणि जोश अजूनही माझ्या मनात ताजा आहे. म्हणून आरोग्यदायी आणि अधिक शाश्वत अस्तित्वाचा संदेश पोहोचविणाऱ्या या वर्षीच्या राइडसाठीही मी उत्सुक आहे.’ असं अभिनेते मिलिंद सोमण म्हणाले.