बेळगावमध्ये ‘पहिलं बालनाट्य संमेलना’चं १८ आणि १९ फेब्रुवारी २०२३ दरम्यान आयोजन !

मुंबई: बेळगावमध्ये मुंबईच्या बालरंगभूमी अभियान संस्थेतर्फे १८ आणि १९ फेब्रुवारी २०२३ दरम्यान संत मीरा हायस्कूल इथं ‘पहिल्या बालनाट्य संमेलनाचं’ आयोजन करण्यात आलं आहे. ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा बेळगाव’ आणि ‘फुलोरा बेळगाव’ या संस्थांचं सहकार्य संमेलनाला लाभलं आहे. संमेलनासाठी बेळगावमधल्या २५ ते ३० शाळांतील प्रत्येकी १५ मुलं , याप्रमाणं एकूण ३०० मुलांचा सहभाग असणार आहे. या संमेलनाला अभिनेते सुबोध भावे, प्रसिद्ध अभिनेत्री सई लोकूर, अभिनेते प्रसाद पंडित, संमेलनाध्यक्षा मीना नाईक यांसह अनेक दिग्गज उपस्थित राहणार असल्याचं मुंबई बालरंगभूमी अभियानाच्या अध्यक्षा वीणा लोकूर यांनी सांगितलं आहे.

शनिवार १८ फेब्रुवारीला दुपारी नाट्यदिंडीनं संमेलनाचं उद्घाटन करण्यात येईल. संमेलनात शिबिरार्थींसाठी बेळगावच्या कलाकारांचा सहभाग असलेली दोन बालनाट्य, बालरंगभूमी अभियानसाठी काम करणारे मुंबई आणि पुण्यातील तज्ञ आणि तीनशे मुलांसाठी अभिनयाची कार्यशाळा, प्रत्येक शाळेतून येणाऱ्या शिक्षक आणि पालकांसाठी चर्चासत्राचं आयोजन, महाराष्ट्रातून राज्य नाट्य स्पर्धेला बक्षीस मिळवलेल्या तीन नाटकांच्या प्रयोगांचं सादरीकरण होणार आहे.

पहिलं बालनाट्य संमेलन बेळगाव इथं घेण्यामागे आयोजकांचा बेळगावच्या मुलांमध्ये अभिनयाची आवड निर्माण व्हावी, आत्मविश्वास वाढावा, त्यांच्यामध्ये सभाधिटपणा यावा, हा उद्देश आहे. बेळगावसारख्या ठिकाणी मराठी भाषेचं संवर्धन व्हावं, आणि ती तिथं टिकावी या साठी इथल्या अनेक संस्था प्रयत्न करीत असतात. मराठी कला संस्कृतीचं जतन व्हावं यासाठी विविध कार्यक्रमांचे संमेलनांचे अयोज़न केलं जातं.

बालनाट्य संमेलन ३०० मुलांसाठी पूर्णपणं मोफत असणार आहे. त्यांची जेवणा खाण्याची व्यवस्था संमेलनस्थळी करण्यात आलेली आहे. संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा मीना नाईक यांना नुकताच संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला असून त्या स्वतः दोन्ही दिवस संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. बेळगावच्या प्रसिद्ध अभिनेत्री सई लोकूर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घघाटन होणार आहे. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात बेळगावमधल्या नाटकातून केली आहे. समारोपाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे, बेळगावचे प्रसिद्ध अभिनेते प्रसाद पंडित आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

‘बालरंगभूमी अभियान, मुंबई’ ही संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत असून संस्थेनं आतापर्यंत बाल रंगभूमीच्या संदर्भात वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. बालनाट्याचे विषय, सादरीकरण, इतर तांत्रिक बाबी कशा असाव्यात याच्याबद्दल संस्था आग्रही असून संस्थेच्या सभासदांनी यासंदर्भात वेगवेगळ्या गावात जाऊन मोफत कार्यशाळा घेतली आहे. शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या बाल राज्य नाट्य स्पर्धेमधील विषय आणि त्याची मांडणी कशी असावी, यासंदर्भातली एक कार्यशाळा शासनाच्या मदतीनं संस्थेनं घेतली आहे. मुंबई, महाराष्ट्रासह बेळगाव, कारवारमध्ये अनेक वर्ष ही संस्था सांस्कृतिक, नाट्य चळवळीचे’ विपुल कार्य करीत आहे. १८ आणि १९ फेब्रुवारी २०२३ ला बेळगाव ‘पहिल्या बालनाट्य संमेलनाचे’ आयोजन करून ‘बालरंगभूमी अभियान, मुंबई’ ने एक डौलदार पाऊल पुढे टाकले आहे.