भारोत्तलनमध्ये मनमाडच्या खेळाडूंची विक्रमासह पदकांना गवसणी

भोपाळ/इंदूर : खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत सोमवारी भारोत्तलनच्या(वेटलिफ्टिंग) वीणाताई आहेर आणि आकांक्षा व्यवहारे या मनमाडच्या खेळाडूंनी महाराष्ट्राच्या पदकांचा भार सहजपणे उचलला. वीणाताईने राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर आकांशा व्यवहारेने पदार्पणात सोनेरी यश मिळविले.

वीणाताई आहेर हिने स्नॅचमध्ये ५७ आणि क्लिन ॲण्ड जर्क प्रकारात ७२ असे एकूण १२९ किलो वजन उचलून सुवर्णपदकाचा मान मिळविला. दोन्ही प्रकारात तिसऱ्या प्रयत्नांत तिने आपली सर्वोत्तम कामगिरी केली. वीणाने दुसऱ्या क्रमांकावरील ज्योत्स्ना साबर (११८) आणि प्रितीस्मिता भोज (११७) या ओडिशाच्या दोघींना मोठ्या फरकाने मागे टाकले. वीणाने या स्पर्धेत क्लीन ॲण्ड जर्क प्रकारात आपली कामगिरी उंचावताना थेट राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घातली. वीणाताईने आकांक्षा व्यवहारेच्या ७१ किलो वजनाचा विक्रम एका किलोने मोडीत काढला. आकांक्षाने गेल्यावर्षी मोदीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत या विक्रमाची नोंद केली होती.

त्यानंतर संध्याकाळच्या सत्रात आकांक्षाने ४५ किलो गटात स्नॅचमध्ये ६७ आणि क्लिन ॲण्ड जर्कमध्ये ७७ असे १४४ किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळविले. तिला महाराष्ट्राच्याच अस्मिता ढोणेकडून आव्हान मिळाले. मात्र, अस्मिता स्नॅच प्रकारात (६१ किलो) मागे राहिली. मात्र, क्लिन ॲण्ड जर्कमध्ये अस्मिताने ८२ किलो वजन उचलून नव्या विक्रमाची नोंद केली. ती १४३ किलो वजन उचलून रौप्यपदकाची मानकरी ठरली. या दोन्ही खेळाडूंना प्रवीण व्यवहारे आणि तृप्ती पराशर यांचे मार्गदर्शन मिळते.