मल्लखांब या पारंपरिक क्रीडाप्रकाराला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे मुंबईतील श्री समर्थ व्यायाम मंदिर  – उदय देशपांडे

महाराष्ट्रात दोनशे वर्षांपूर्वी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात ‘मल्लखांब’ या पारंपरिक क्रीडा प्रकाराचा उगम झाला. १९२५ ला मुंबईतील दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिर इथं मल्लखांबच्या क्रीडा प्रशिक्षणाला सुरुवात झाली. संस्थापक व्यायाम महर्षी प्रल्हाद लक्ष्मण काळे गुरुजी यांनी श्री समर्थ व्यायाम मंदिरची स्थापना केली. संस्थेला ९६ वर्षे झाली असून इथं व्यायाम, क्रीडा, शारीरिक शिक्षणाचं प्रशिक्षण दिलं जातं. दैनंदिन १ हजार विद्यार्थी मल्लखांब, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, जिमनॅस्टिक, अॅथलेटिक्स, जुडो, खोखो आदी खेळाचं प्रशिक्षण घेतात. खेळाडूंकडून दर महिना नाममात्र ३०/- रुपये शुल्क घेतलं जातं.

केंद्र सरकारच्या फिट इंडिया मुव्हमेंटच्या अनुषंगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य या मुख्य मुद्द्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. संपूर्ण देशाचं आरोग्य सुदृढ राहण्यासाठी फिट इंडिया मुव्हमेंटची आवश्यकता आहे. शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, सर्वसाधारण नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक सर्वांचं आरोग्य सुधारणं महत्वाचं असून त्यांना व्याधींपासून दूर ठेवणं गरजेचं आहे. ते मल्लखांब या क्रीडा प्रकारानं होऊ शकतं. महाराष्ट्रात दोनशे वर्षांपूर्वी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात मल्लखांब या पारंपारिक क्रीडा प्रकाराचा उगम झाला.

१९२५ ला मुंबईतील दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिर इथं मल्लखांबच्या क्रीडा प्रशिक्षणाला सुरुवात झाली. संस्थापक व्यायाम महर्षी प्रल्हाद लक्ष्मण काळे गुरुजी यांनी श्री समर्थ व्यायाम मंदिरची स्थापना केली. संस्थेला ९६ वर्षे झाली असून इथं व्यायाम, क्रीडा, शारीरिक शिक्षणाचं प्रशिक्षण दिलं जातं. दैनंदिन १ हजार विद्यार्थी मल्लखांब, बास्केटबॉल, वॉलिबॉल, जिम्नॅस्टिक्स, अॅथलेटिक्स, जुडो, खोखो आदी खेळाचं प्रशिक्षण घेतात. खेळाडूंकडून दर महिना नाममात्र ३०/- रुपये शुल्क घेतलं जातं. प्रशिक्षक हे कोणत्याही प्रकारचं मानधन न घेता खेळाडूंना २ ते ३ तास प्रशिक्षणासाठी वेळ देतात. हे प्रशिक्षक त्यांच्या खेळांमध्ये जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर प्राविण्य आणि पुरस्कार मिळवलेले आहेत.

श्री समर्थ व्यायाम मंदिरचे मानद कार्यवाह उदय देशपांडे सांगतात, ‘मी वयाच्या ३ वर्षांपासून संस्थेत आलो आणि आज माझं वय ६५ वर्षे आहे. सुरुवातीला मी व्यायाम शाळेत जास्तीत जास्त मुला-मुलींना मल्लखांब शिकवायला सुरुवात केली. मुंबईमध्ये श्री समर्थ व्यायाम मंदिर सारख्या आणखी २-३ संस्था कार्यरत होत्या. त्यानंतर मुंबई आणि मुंबई उपनगरात ५० ते ६० संस्था सुरु झाल्या. त्यानंतर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये काम करायला सुरुवात केली. तिथं जाऊन मल्लखांबाची प्रात्याक्षिके दाखणं, प्रशिक्षण शिबिरं आयोजित करणं, खेळाडूंना मागदर्शन करणं सुरु होतं. महाराष्ट्राच्या ३५ जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र मल्लखांब संघटना नोंदणीकृतरित्या स्थापन करून त्या राज्य मल्लखांब संघटनेशी संलग्न केल्या. नंतर महाराष्ट्राच्या बाहेर अन्य जिल्ह्यांमध्ये मल्लखांबाचं प्रात्याक्षिके, प्रशिक्षण घेऊन माणसं तयार केली आणि मल्लखांबासाठी वातावरणनिर्मिती केली. तसेच प्रत्येक ठिकाणी जाऊन नोंदणीकृत संघटना केल्या आणि त्या मल्लखांबा फेडरेशन ऑफ इंडियाला संलग्न केल्या. आज भारतात गुजरात, मध्यप्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, केरळ, गोवा, कर्नाटक, छत्तीसगड आदी राज्यात मल्लखांबाचं नियमित प्रशिक्षण चालत असून २९ राज्यांमध्ये मल्लखांबाच्या स्वतंत्र राज्य संघटना आहेत. १९९७ पासून विदेशात जाणं सुरु केलं आणि ४७ देशांमध्ये गेलो. परदेशात बरेच लोकं जाऊन मल्लखांबाची प्रात्याक्षिके दाखवत. पण मी मल्लखांब प्रात्याक्षिकांसह त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांनी मल्लखांबाचं सुरु करावं, यासाठी प्रयत्न केले. आता प्रत्येक ठिकाणी मल्लखांबाचं नियमित प्रशिक्षण चालतं. जर्मनी मल्लखांब फेडरेशन, अमेरिका मल्लखांब फेडरेशन, मलेशिया मल्लखांब फेडरेशन अशा स्थानिक राष्ट्रीय संघटना स्थापन झाल्या आणि विश्व मल्लखांब फेडरेशनची स्थापना केली. सर्व आंतरारष्ट्रीय मल्लखांब संघटना विश्व मल्लखांब फेडरेशनला संलग्न केल्या. श्री समर्थ व्यायाम मंदिरनं मल्लखांबाचे १ लाखांपेक्षा अधिक खेळाडू आणि ३ हजारापेक्षा अधिक प्रशिक्षक राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर घडवले आहेत.

मुंबईत दादरच्या शिवाजी उद्यानावर १७ फेब्रुवारी २०१९ मध्ये पहिली विश्व मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यामध्ये १५ हून अधिक देशांनी भाग घेतला होता. त्यात भारतानं सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धांमध्ये जपान आणि इटलीच्या खेळाडूंनीही यश संपादन केलं. अनेक देशांमध्ये मल्लखांबाचं नियमित प्रशिक्षण सुरु आहे. अनेक देशातील लोक श्री समर्थ व्यायाम मंदिर इथं येऊन मल्लखांबाचं प्रशिक्षण घेतात. आता दुसरी मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धा अमेरिकेत होणार आहे.’

फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत मल्लखांबामध्ये विविध प्रकारच्या कसरती, आसनं, व्यायाम आहेत. मल्लखांब हा कमीत कमी वेळेत शरीरातील जास्तीत जास्त भागांना व्यायाम देतो. मल्लखांबामुळे हातापायांचे स्नायू, श्वसनसंस्था, पचनसंस्था, हृद्याभिसरण संस्था आदींना कमीत कमी वेळेत व्यायाम मिळतो. मल्लखांबामुळे एकाग्रता, मनाचा कणखरपणा, निर्णयक्षमता, स्मरणशक्ती, आकलन क्षमता वाढण्यास मदत होते. तळागाळात मल्लखांब पोहोचणं, लहान मुलांसह महिला आणि ज्येष्ठ नागरिकही मल्लखांब करू शकतात आणि त्याचा नियमित सराव करणं गरजेचं आहे. कोरोना महामारीच्या कालावधीत व्यक्तीला रोगप्रतिकारक शक्तीचं महत्त्व समजल असेल. ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मल्लखांब हा उत्तम उपाय आहे.