महाराष्ट्राला योगासनात ४ सुवर्ण, ४ रौप्य आणि ४ कांस्य पदके !

उज्जैन: खेलो इंडिया युथ गेम्स २०२२-२३ मध्ये योगासन प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चार सुवर्णपदकांसह चार रौप्य आणि चार कांस्यपदकांची कमाई केली. योगासनात मुलींच्या १८ वर्षांखालील गटात कलात्मक प्रकारात महाराष्ट्राच्या मुलींनी निर्विवाद वर्चस्व राखताना विजयमंचावरील पहिली तीनही स्थाने पटकावली. यामध्ये रुद्राक्षी भावे ही सुवर्ण, तर निरल वाडेकर ही रौप्य आणि स्वरा गुजर कांस्य पदकाची मानकरी ठरली. पारंपरिक प्रकारात निरलला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तृप्ती डोंगरे आणि देवांशी वाकळेने तालबद्ध प्रकारातील दुहेरीत सोनेरी यशाची कामगिरी केली. या प्रकारात स्वरा गुजर आणि प्रांजल वहान्नला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

मुलांच्या विभागात पारंपरिक प्रकारात सुमित बंडाळे हा सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. स्वराज फिस्केने कांस्य पदक मिळविले. स्वराजने पारंपरिक प्रकारात हुकलेले सोनेरी यश कलात्मक प्रकारात साध्य केले. निबोध पाटील या प्रकारात ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरला. तालबद्ध प्रकारात दुहेरीत अंश मयेकर-नानक अभंगने रौप्य, तर रुपेश सांघे आणि सुमित बंडाळे जोडीने कांस्यपदकाची कमाई केली.

योगापटूंची कामगिरी उत्साहवर्धक – गिरीश महाजन

‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या पदक संख्येत योगापटूंच्या यशाचा सर्वांत मोठा वाटा होता. त्याचीच परिणती खेलो इंडिया युवा स्पर्धेत आली. येथेही योगपटूंनी आपल्या कामगिरीने महाराष्ट्राची मान ताठ राखली आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. चौथ्या पर्वाची आता कुठे सुरुवात झाली आहे. योगपटूंची ही दुहेरी पदक संख्या निश्चितच उर्वरित स्पर्धेत खेळाडूंच्या उत्साहात भर घालेल यात शंकाच नाही,’ अशी प्रतिक्रिया राज्याचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.