मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. देशाच्या सांस्कृतिक चळवळीसाठी ही ऐतिहासिक घटना आहे. संपूर्ण भारताचा शेकडो वर्षांचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा या वस्तुसंग्रहालयाने जतन केला. विद्यार्थ्यांपासून ते अभ्यासू संशोधक अशा सर्वांनाच शैक्षणिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करणारे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय.
१९०४ मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी सरकारने एक ठराव मंजूर केला आणि बॉम्बेमध्ये सार्वजनिक संग्रहालय निश्चित करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. त्यामध्ये सर फिरोजशाह मेहता, सर इब्राहिम रहिमतुल्ला आणि सर विठ्ठलदास ठाकरे हे या समितीचे सदस्य होते. संग्रहालयात १९०६ मध्ये पहिली वस्तू आली ती लॉकवुड किपलिंग यांनी तयार केलेले बुद्धाचे प्लास्टर कास्ट हेड. सेठ पुरुषोत्तम मावजी यांचा पुरातन वास्तू आणि लघुचित्रांचा संग्रह विश्वस्तांनी १९१५ मध्ये खरेदी केला आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून मिळवलेल्या पुरातन वास्तूंनी संग्रहालयाचा भव्य संग्रह समृद्ध केला गेला. १९३३ मध्ये सर दोराब टाटा यांचा संग्रह मृत्यूपत्र म्हणून संग्रहालयात आला. कापड, शस्त्रे, कांस्य आणि चित्रे यासारख्या उत्कृष्ट भारतीय पुरातन वास्तूंसोबतच, टाटा संग्रहामध्ये युरोपियन, पूर्व-आशियाई आणि आग्नेय आशियाई कलेचाही समावेश करण्यात आला आहे. गेल्या शतकात संग्रहालयाच्या विस्तृत संग्रहात सुमारे ७० हजार वस्तूंचा समावेश झाला आहे. ज्यात मानवी कथा, विशेषत: भारतीय उपखंडाची, अगदी पूर्व-ऐतिहासिक काळापासून आजपर्यंतची गोष्ट सांगितली गेली आहे.
वैयक्तिक संग्राहकांनी संग्रहालयाचे भांडार मोठ्या प्रमाणात समृद्ध केले. जगभरातील कला इतिहासकारांनी संशोधन कार्यासाठी वस्तुसंग्रहालयाला भेट दिली आहे. २०१९ ला संग्रहालयाने मुंबईतील पहिले बालसंग्रहालय उघडले. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने जपान, स्वीडन, मॉरिशस, यूएसए आणि यूके येथे भारतीय संस्कृतीवरील प्रदर्शने सादर केली आहेत.हे संग्रहालय केवळ वस्तूंचा संग्रह नसून यातील दालनांचे वेगळेपण म्हणजे पुरातन काळापासून ते समकालीन वस्तूंची वैविध्यपूर्ण, वैश्विक आणि नावीन्यपूर्ण मांडणी. सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील भारताच्या या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची अनुभूती अनुभवावी.