मुंबईत झालेला मिठाचा सत्याग्रह…

भारतीय स्वातंत्र्यलढा केवळ ब्रिटीशांच्या सत्तेविरुद्ध नव्हता, तर त्यांनी भारतीयांवर केलेल्या अनन्वित अत्याचारांविरुद्ध, शोषणाविरुद्ध जनआंदोलन, जुलुम आणि गुलामगिरी झिडकारणारं ते स्वातंत्र्ययुद्ध आणि क्रांतीपर्व होतं. १८५७ च्या स्वातंत्र्य उठावानंतर प्रत्येक दशकात या युद्धाला धार चढत गेली. प्रसंगी प्राणांची आहुती देऊन असंख्य क्रांतीकारकांनी देशविदेशात सर्वत्र ब्रिटीश सरकार विरुद्ध बंड करायला सुरुवात केली.एका बाजूस संघटनात्मक जनआंदोलनं, सामाजिक बहिष्कार तर दुसऱ्या बाजूस सशस्त्र क्रांती असे या लढ्यास दुहेरी स्वरूप होतं. संपूर्ण देशभर त्याची व्याप्ती होती . पण ब्रिटीश सरकारचं मुख्य केंद्र मुंबई असल्यामुळं मुंबई हे स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रमुख स्थान झालं. देशविदेशातील अनेक घटनांचा प्रतिसाद त्यामुळं मुंबईत स्वाभाविक उमटत होता.

टिळक युगाच्या अस्तानंतर महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहाचं नवीन हत्यार भारतीयांना मिळालं आणि सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु झाली .१९३० साली झालेला मिठाचा सत्याग्रह या चळवळीचा दिशादर्शी ठरला . १८८२ ला केलेल्या कायद्यानुसार ब्रिटीशांनी मिठाच्या उत्पादन आणि साठ्यावर सरकारी एकाधिकार निर्माण केला होता. मिठावरील वाढीव करांमुळं दैनंदिन अन्न खाणंसुद्धा भारतीयांसाठी महागलं. या जाचक कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी आपल्या सत्याग्रही कार्यकर्त्यांसह साबरमती ते दांडी ही पदयात्रा काढली . मिठाच्या सत्याग्रहासाठी केलेली दांडीयात्रा ऐतिहासिक ठरली आणि गाजली. पण असंच मिठाचं सत्याग्रह अनेक ठिकाणी झालं . महात्मा गांधींच्या अनेक अनुयायांनी त्यांचे नेतृत्व केलं.

मुंबईतही मिठाचा सत्याग्रह अलौकिक प्रकारे झाला. या लढ्याचं नेतृत्व केलं धडाडीच्या गांधीवादी नेत्या कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी. ६ एप्रिल १९३० रोजी शेकडो महिला कमलादेवींच्या नेतृत्वाखाली गिरगांव चौपाटीवर एकत्र जमल्या . आपल्याबरोबर आणलेल्या चुलींवर त्यांनी समुद्राचे पाणी आटवून मीठ बनवलं. ब्रिटीश सरकारविरुद्धचं हे अनोखं आंदोलन बघण्यासाठी चौपाटीवर प्रचंड गर्दी झाली . पोलिसांनी आंदोलन मोडण्यासाठी अमानुष लाठीमार केला . अनेक स्त्रिया जखमी झाल्या. स्वतः कमलादेवी या लाठीहल्ल्यात चुलीवर पडून काही ठिकाणी भाजल्या व जखमी झाल्या. तरीही त्या तसूभर हलल्या नाहीत . जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं. महिलांनी केलेल्या या सत्याग्रहाची मुंबईत खूप चर्चा झाली . पुढे या आंदोलनातील स्त्रियांनी बनवलेल्या मिठाची मुंबई उच्च न्यायालयाजवळ विक्री केली गेली. मुंबईतील कॉंग्रेस भवनाच्या गच्चीवरही मीठ करण्याचे प्रयत्न झाले. तिथं पोलिसांच्या धाडी विरोधात स्त्रीयांनी काँग्रेस भवनालाच गराडा घालून वेढलं. हे आंदोलन बरेच महिने चालू राहिलं.

१३ एप्रिल १९३० ला गिरगांव चौपाटीला मोठ्ठी जनसभा भरली. सुमारे पन्नास हजार लोक जमले होते . सरोजिनी नायडू, पेरीन कॅप्टन, अबीद अली जाफरभाई अशा अनेक नेत्यांची भाषणं झाली. पोलिसांनी लाठीमारासहीत ही जनसभा उधळण्याचा भरपूर प्रयत्न केला . पण लोक चहुबाजूनं येतच राहिले .

१६ एप्रिल १९३० रोजी कमलादेवींच्या नेतृत्वाखाली सुमारे पाचशे सत्याग्रहींनी वडाळा येथील मिठागरावर जमून तेथील मिठ घेऊन लोकांना विकलं. याच मिठागरावर १८ मे १९३० रोजी फारच मोठ्या संख्येनं म्हणजे जवळ जवळ २०,००० सत्याग्रहींनी मिठ उचलून सत्याग्रह केला. पोलीसांनी अमानुष लाठी हल्ला केला . असंख्य लोक जखमी झाले, कित्येकांची डोकी फुटली, पण लोकांचा असंतोष इतका होता की, क्रूर अशा पोलिसी कारवाईला ते अहिंसेच्या मार्गाने धडाडीने सामोरे जात होते. वडाळा मिठाच्या सत्याग्रहावर पोलिसांनी केलेल्या या अमानवी कृत्यांचा निषेध म्हणून दुसऱ्या दिवशी मुंबई स्टॉक एक्सेंज बंद राहिलं. संपूर्ण मुंबईत व्यापाऱ्यांनी आणि सर्वसामान्य लोकांनी या घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळला. मिठाचा सत्याग्रह हे ब्रिटीशांच्या जुलुमी कराविरुद्ध केवळ एक आंदोलन नव्हत. पारतंत्र्याखाली पिचलेल्या भारतीयांच्या असंतोषाचा तो उद्रेकच होता. याच सत्याग्रहात पुढील ‘चले जाव’ चळवळीची मुळे रोवली गेली . ब्रिटीशांना भारतीय यापुढे आपलं शासन मान्य करणार नाहीत, हे पुरतं कळून चुकलं.

आज चौपाटीवर फेरफटका मारताना आपल्याला टिळकांच्या पुतळ्यापाशी निदान त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आठवते. मिठाच्या सत्याग्रहाच्या अमानुष हल्यात जे जे जखमी झाले, त्यांच्या वेदनांची जाणीवही नसते . किंबहुना त्यांच्या इतिहासाचा विसरच पडलेला असतो . वडाळ्याच्या ऐतिहासिक मिठागाराच्या पाऊलखुणाच जिथं नष्ट होताहेत तिथं कधीकाळी मिठाच्या सत्याग्रहात २०,००० हून अधिक लोक सहभागी झाले होते हे कसं आठवणार ? भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील विविध ठिकाणी असंख्य लोकांनी दिलेल्या बलिदानाचा, त्यागाचा, अन्यायाविरुद्ध केलेल्या प्रतिकाराचा इतिहास नवीन पिढ्यांना कळावा, त्या इतिहासाचे संस्मरण व्हावं, त्यातून स्फूर्ति घेऊन राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरणा घ्यावी.