संगीतकार अनु मलिक यांच्या हस्ते ‘विरजण’ चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा संपन्न!

पुणे : संगीतकार अनु मलिक यांच्या हस्ते ‘जैन फिल्म प्रॉडक्शन’ प्रस्तुत विरजण चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम चाकणकर ‘विरजण’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. दाक्षिणात्य गायिका मंगलीने ‘विरजण’ चित्रपटातील ‘अरे देवा’ गाण्यातून मराठी विश्वात झेंडा रोवलाय.

प्रेमाच्या नावेचा संथ गतीने होणारा प्रवास अचानक आलेल्या वादळामुळे केव्हा नावेची दिशा भरकटवेल हे सांगता येणं कठीण. प्रेम ही भावना आहे आणि ती कधीही दुखावली जाऊ शकते, हे सांगणारी एक अनोखी कहाणी ‘जैन फिल्म प्रॉडक्शन’ प्रस्तुत ‘विरजण’ या चित्रपटातून चित्रपट रसिकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात, तशाच प्रेमालाही आहेत. प्रेम करणं ते टिकवणं आणि निभावणं या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नाहीत, याची जाणीव या चित्रपटातून अभिनेता सोहम चाकणकर आणि अभिनेत्री शिल्पा ठाकरे यांची फ्रेशजोडी करून देणार आहे. नुकताच या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा पुणे येथे पार पडला. सुप्रसिद्ध संगीतकार अनु मलिक यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्धघाटन करण्यात आले. तर ‘सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन’चे डॉ. संजय चोरडिया, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे संचालक प्रवीणकुमार नाहटा, प्रदीपजी नाहर, जुगराजजी जैन, महेंद्रजी पातारे तसेच ‘विरजण’ चित्रपटातील कलाकार आणि चित्रपटाची टीम यांनी सोहळ्याला उपस्थित राहून चारचाँद लावले.

कोणत्याही कलाकृतीला भाषा, प्रांत कशाचही बंधन नसतं असं म्हटलं जातं आणि याची पुन्हा एकदा नव्याने जाणीव तेलुगू गायिका सत्यावथी मंगली हिने करून दिली आहे. ‘विरजण’ या चित्रपटातील ‘देवा’ या गाण्याला मंगलीने सुमधुर स्वरात स्वरसाज चढवलाय. ‘देवा’ या गाण्यामुळे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील मंगली गायन क्षेत्रातील नवीन आकर्षण बनली आहे. ‘विरजण’ चित्रपटातील ‘देवा’ या गाण्याला मंगलीने आवाज देऊन मराठी सिनेविश्वात नव्याने ठसा उमटविला आहे. या गाण्याची जबाबदार मंगलीने उत्तमरीत्या पेलवली असून प्रशांत सातोसे यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. तर या गाण्याचे बोल विनायक पवार लिखित आहेत. दुर्गेश राजभट्ट याने या गाण्याची म्युझिक प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे, तर संकेत टोळे याने हे गाणं मिक्स अँड मास्टर्ड केले आहे. तर चित्रपटातील इतर गाणीही रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतील यांत शंका नाही. ‘अरे देवा’ या गाण्याला मिळालेल्या मंगलीच्या आवाजासह शिल्पा आणि सोहमची लव्हेबल केमिस्ट्री कशी असेल याचा अंदाज येतोय. ‘जैन फिल्म प्रॉडक्शन’ प्रस्तुत निर्माते सागर जैन, ऋषभ कोठारी, राजू तोडसाम निर्मित आणि दिग्दर्शक कपिल जोंधळे दिग्दर्शित ‘विरजण’ हा चित्रपट असून या चित्रपटाची कथा लेखक नितीन सूर्यवंशी यांनी लिहिली आहे. तर चित्रपटाच्या संगीताची बाजू संगीतकार प्रशांत सातोसे यांनी सांभाळली आहे. तसेच या चित्रपटाचा उत्तम असा कॅनव्हास व्यंकेट कुमार यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. तर कार्यकारी निर्माता आणि मार्केटिंग प्लॅन राजेंद्र सावंत दिनेश हे आखत आहेत.

‘तू आणि मी, मी आणि तू’ हे नाव असलेला चित्रपट आता ‘विरजण’ या नावाने प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच चित्रपटाची कथा कुठे विरजण घालणार हे पाहणं आता रंजक ठरणार आहे. तर चित्रपटातील गाण्यांनी ही उत्सुकता आणखीनच ताणली गेली आहे.