स्वातंत्र्यलढ्यातील आझाद मैदान…

दक्षिण मुंबईतील एस्प्लनेड किंवा पोलो ग्राऊंड म्हणजे आजचे आझाद मैदान. १८५७च्या बंडात मुंबईतील दोन सैनिकांना तोफेच्या तोंडी देण्यात आलं ती ही जागा. जुलमी ब्रिटिश साम्राज्यानं मुंबईकरांना दिलेला तो इशारा होता.

१८५७ साली उत्तर भारतात इंग्रजांविरुद्ध प्रचंड क्रांतीचा वणवा पेटला, हे आपल्याला माहीतच आहे. मेरठ, लखनऊ, कानपूर, दिल्ली ही क्रांतीची मुख्य ठिकाणे होती. क्रांती नेत्यांनी इंग्रजी इस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय सैनिकांनाच क्रांतीसाठी उद्युक्त केलं होतं. मुंबईसुद्धा खदखदत होती. शहरातले इंग्रज अतिशय घाबरले होते. त्यांनी आपली बायका मुलं बंदरात नांगरलेल्या जहाजांवर नेऊन ठेवली होती. केव्हा, कुठून, कसा उद्रेक होईल, याचा कसलाही भरवसा नव्हता. या स्थितीत मुंबईचा पोलिस कमिशनर चार्ल्स फोर्जेट यानं फारच हिमतीनं परिस्थिती सांभाळली. आपले गुप्तचर कामाला लावून आणि स्वत: देखील वेष पालटून शहरात सर्वत्र फिरून त्यानं सैन्यातल्या बंडखोरांच्या नेत्यांना शोधलं आणि पकडलं. १३ ऑक्टोबर १८५७ या दिवशी या लोकांवर सैनिकी खटला म्हणजे कोर्ट मार्शल होऊन सहा जणांना जन्मठेप आणि दोघांना मृत्यूदंड ठोठावण्यात आला. हा खटला फोर्ट सेंट जॉर्जमध्ये म्हणजे आजच्या सेंट जॉर्ज रुग्णालय या ठिकाणी झाला. मृत्यूदंड झालेल्या मंगल गद्रिया आणि सय्यद हुसेन या दोघांना त्याच दिवशी संध्याकाळी पोलो ग्राऊंडवर जाहीरपणे तोफेच्या तोंडी देण्यात आलं.

साधारण १९२१ सालानंतर स्वातंत्र्य चळवळीतले मोर्चे, निदर्शनं, सत्याग्रह, सभा या इथंच होऊ लागल्या आणि मैदानाचं नाव एस्पलनेड किंवा पोलो ग्राऊंड हे नाव मागे पडून आझाद मैदान हे नाव रुळ झालं.