जबलपूर/भोपाळ : दोन वेळचा विजेता महाराष्ट्र संघ पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्समध्ये विक्रमी पदकांची कमाई करण्यासाठी सज्ज झाला आहे. पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्सला सुरुवात होत आहे. चार वेळचा विजेता महाराष्ट्र महिला आणि पुरुष खो-खो संघांना पहिल्याच दिवशी विजय सलामीची मोठी संधी आहे.
मध्यप्रदेश येथे आयोजित पाचव्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राचे ३७७ खेळाडू सहभागी होणार आहेत. हे खेळाडू २२ खेळ प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. यामध्ये टेबल टेनिस, खो- खो, मुष्टीयुद्ध (बॉक्सिंग), बास्केटबॉल, बॅडमिंटन, तिरंदाजी, नेमबाजी, कयाकिंग आणि कनोइंग, योगासन, गटका, सायकलिंग ट्रॅक, ॲथलेटिक्स, कबड्डी, भारोत्तलन (वेटलिफ्टिंग), लॉन टेनिस, मल्लखांब, तलवारबाजी, कुस्ती आणि जलतरण या खेळ प्रकारांचा समावेश आहे.
‘आमच्या खेळाडूंना सरावाच्या वेळी अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आणि सर्वोत्तम मार्गदर्शन मिळाले असल्यामुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या खेलो इंडिया गेम्स मध्ये महाराष्ट्राचा संघ सर्वसाधारण विजेतेपद मिळविणारच. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या काही खेळाडूंचे येथे आगमन झाले असून हे खेळाडू येथील विविध क्रीडा संकुलांमध्ये सरावही करू लागले आहेत. स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंना आणि संघाच्या इतर पदाधिकाऱ्यांना कोणतीही समस्या येऊ नये यासाठी येथील संयोजकांनी अतिशय चांगली व्यवस्था केली आहे. स्पर्धेत असलेल्या २७ क्रीडा प्रकारांपैकी २२ क्रीडा प्रकारांमध्ये महाराष्ट्राचे पावणे चारशे खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यांच्या मदतीसाठी सव्वाशेहून अधिक सपोर्ट स्टाफचा सहभाग असणार आहे. खो खो व कबड्डी इत्यादी सांघिक खेळांमध्ये आम्हाला विजेतेपदाची खात्री आहे. या संघांनी खूप चांगली तयारी केली आहे या खेळाडूंना नियमित मार्गदर्शकांबरोबरच अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूंचेही विशेष मार्गदर्शन लाभले आहे. त्यांना मेंटल ट्रेनर, फिजिओ, व्हिडिओ ॲनेलिसिस, मेडिटेशन इत्यादी बाबतही अनुभवी तज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे,’असे महाराष्ट्र संघाचे पथक प्रमुख चंद्रकांत कांबळे यांनी सांगितले.