मुंबई : गोरेगाव इथं ४३ व्या प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचं युवा सेनेचे अध्यक्ष आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज उद्घघाटन करण्यात आलं. यावेळी शिवसेना नेते, माजी उद्योगमंत्री आणि प्रबोधन गोरेगावचे संस्थापक सुभाष देसाई उपस्थित होते. प्रबोधन क्रीडा भवन इथं आजपासून सुरू झालेला आंतरशालेय क्रीडा महोत्सव हा ७ जानेवारी २०२३पर्यंत सुरू राहणार आहे. यंदा वांद्रा ते दहिसर भागातल्या २०० शाळांमधून ६ हजार विद्यार्थी या क्रीडा महोत्सवात सहभागी झाले आहेत.’शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं, असं आवाहन करत आदित्य ठाकरे यांनी क्रीडा महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.’
प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवात खोखो, कबड्डी, बुद्धिबळ, तिरंदाजी, मल्लखांब, कराटे,जलतरण, टेनिस, ॲथेलेटिक्स, रिले, मार्चपाल आदी क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. विजेत्यांना चषक, पदक, प्रमाणपत्र आणि सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. यावेळी प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष नितीन शिंदे, कार्याध्यक्ष कैलास शिंदे, प्रमुख कार्यवाह गोविंद गावडे खजिनदार रमेश इस्वलकर, शिवसेनेचे उपनेते अमोल कीर्तीकर, माजी नगरसेवक स्वप्नील टेम्बवलकर , राजू पाध्ये , समीर देसाई आदींसह प्रबोधन गोरेगावचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.