● जलतरणात ३ सुवर्णांसह ४ पदके
● कयाकिंग प्रकारात जान्हवी राईकवारला कांस्य
● टेनिसमध्ये मधुरिमा उपांत्यपूर्व फेरीत
● कबड्डीत मुली उपांत्य फेरीत
● शुभमला भारोत्तलनामध्ये कांस्य
● तलवारबाजीमध्ये तेजस पाटीलला रौप्य
भोपाळ : महाराष्ट्राने खेलो इंडियाच्या नव्या पर्वातही पदकांच्या शतकाकडे आगेकूच केली आहे. स्पर्धेत मंगळवारी जलतरणपटूंच्या ३ सुवर्णपदकांनी महाराष्ट्राचे स्थान भक्कम झाले. महाराष्ट्राची ३१ सुवर्ण, ३२ रौप्य आणि २८ कांस्य अशी एकूण ९१ पदके झाली आहेत. पदकतालिकेत दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकासाठी मध्य प्रदेश आणि हरियाणात जबरदस्त चुरस सुरू आहे. मध्य प्रदेश पुन्हा एकदा दुसऱ्या स्थानावर आले असून त्यांनी २५ सुवर्ण, १३ रौप्य आणि २१ कांस्य अशी ५९ पदके मिळविली आहेत. हरियाणाची देखील २३ सुवर्ण, १८ रौप्य आणि १८ कांस्य अशी ५९ पदकेच झाली आहेत.
● जलतरणात ३ सुवर्णांसह ४ पदके
जलतरण स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मुंबईच्या वेदांतने २०० मीटर फ्रीस्टाईल शर्यत १ मिनिट ५५.३९ सेकंदात जिंकली. वेदांत अभिनेते आर. माधवन यांचा मुलगा असून त्याने जलतरणात यापूर्वीच आपली छाप पाडली आहे. वेदांत पाठोपाठ आंतरराष्ट्रीय जलतरणपटू अपेक्षा फर्नांडिसने १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक शर्यत १ मिनिट १३.७८ सेकंद वेळ देत जिंकली. अपेक्षाची कामगिरी तिच्या लौकिकास पात्र ठरेल अशीच झाली. ५० मीटर बटर फ्लाय प्रकारात पुण्याच्या शुभमने कमालीच्या आव्हानात्मक शर्यतीनंतर सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याने आसामच्या जनजॉन हजारिका आणि तमिळनाडूच्या श्याम सौंदर्यराजनचे आव्हान मोंडून काढताना २५.४४ सेकंद अशी सरस वेळ दिली. शुभंकर हा पुण्यात भूपेंद्र आचरेकर आणि दुबईत प्रदीप कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. मुलांच्या शंभर मीटर ब्रेस्ट स्ट्रोक शर्यतीत मुंबईच्या अर्जुनला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने १ मिनिट ७.२९ सेकंद अशी वेळ दिली.
● तलवारबाजीमध्ये (फेन्सिंग) तेजस पाटीलला रौप्य
कुमार गटातील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या औरंगाबादच्या तेस पाटीलने तलवारबाजीच्या (फेन्सिंग) फॉईल प्रकारात रौप्यपदक मिळविले. या स्पर्धा प्रकाराचा स्पर्धेत प्रथमच समावेश करण्यात आला आहे. सुवर्ण लढतीत तेजसला बिहारच्या आकाश कुमार विरुद्ध ९-१५ असा पराभव पत्करावा लागला. तेजसचा प्रतिकार तोकडा पडला.
● कयाकिंगमध्ये जान्हवीला कांस्य
महाराष्ट्राला नवख्या असणाऱ्या स्लॅलम (कयाकिंग) या क्रीडा प्रकारात अमरावतीच्या जान्हवी राईकवारने मंगळवारी कांस्यपदकाची कमाई केली. स्पर्धेतील क१ या प्रकारातील २५० अंतराच्या शर्यतीत एकंदर १२ डाऊन आणि ६ अप गेटचे आव्हान खेळाडूंना पार करावे लागते. जान्हवीने शर्यत पूर्ण करतना ३९९.६०० सेकंद अशी वेळ दिली. सुवर्णपदक विजेती भूमी बाघेला हिने सर्वात वेगवान ९०.०६० सेकंद अशी वेळ दिली. या स्पर्धा प्रकाराचा खेलो इंडिया स्पर्धेत प्रथमच समावेश करण्यात आला असून महाराष्ट्रानेही अगदी ऐनवेळी या स्पर्धेत आपला सहभाग निश्चित केला. मुळ अमरावतीची असली, तरी भोपाळ येथे सराव करणाऱ्या जान्हवीने याच सरावाचा आपल्याला फायदा झाल्याचे सांगितले. पदार्पणातच पदकाला गवसणी घातल्याने आनंद झाला आहे. आता या खेळात अधिक प्रगती करण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे तिने सांगितले.
● कबड्डीत मुली उपांत्य फेरीत
कबड्डीत मुलींनी यजमान मध्य प्रदेशाचा ४८-२६ असा दणदणीत पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. हरजित कौर, मनीषा, समृद्धी आणि प्रतिक्षा यांची कामगिरी लक्षवेधी ठरली. महाराष्ट्राच्या मुलींची उपांत्य लढत हिमाचल प्रदेशाशी होणार आहे. मुलांनाही उपांत्य फेरीची संधी असून त्यांची उद्या मध्य प्रदेश संघाशी लढत आहे.
● टेनिसमध्ये मधुरिमा उपांत्यपूर्व फेरीत
टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या मधुरिमा सावंतने आपली आगेकूच कायम राखताना उपांत्यपूर्व फेरी गाठली. आपलीच संघ सहकारी अस्मी आडकरचे आव्हान मधुरिमाने ६-२, २-६, ६-० असे मोडून काढले. सोनल पाटिलने एकेरीत लक्ष्मी प्रभाचा ६-७, ६-४, ६-० असा पराभव केला.
दुहेरीत तनिष्क जाधव आणि निशित रहाणने गुजरातच्या आर्यन शहा-वहिन पटेलचा ७-६, ६-४ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिला दुहेरीत महाराष्ट्राच्या रुमा आणि सोनलला दिल्लीच्या तेजस्वी-लक्ष्मी जोडीकडून ६-२, ६-७, ६-१० असा पराभव पत्करावा लागला.
● भारोत्तलनामध्ये शुभमला कांस्य
भारोत्तलनाच्या (वेटलिफ्टिंग) दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राला शुभम काळभोरच्या एकमात्र कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. शुभमे स्नॅचमध्ये १०८, क्लिन-जर्कमध्ये १३२ असे एकूण २४० किलो वजन उचलले. अरुणाचल प्रदेशाच्या शंकर लापुंगने (१०८, १४०) एकूण २४८ किलो वजन उचलून सुवर्ण, तर आसामच्या सिद्धांता गोगोईने (११०, १३३) २४३ किलो वजन उचलून रौप्यपदक मिळविले.
● मल्लखांब : महाराष्ट्र संघ रौप्यपदकाचा मानकरी
गत उपविजेत्या महाराष्ट्र मल्लखांब संघाने पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्समध्ये मंगळवारी रौप्य पदकाचा बहुमान पटकावला. महाराष्ट्र संघ सांघिक गटामध्ये रौप्य पदकाचा मानकरी ठरला आहे. राष्ट्रीय खेळाडू शार्दूल जोशी, दर्शन, रणवीर मोहिते, वेदांत शिंदे, ऋषभ, मृगांक पाथरे, श्रेया सपकाळ, समीक्षा सुरडकर, प्रणाली मोरे, तनुश्री जाधव आणि आकांक्षा बरगेने सर्वोत्तम करसतीच्या बळावर महाराष्ट्राला पदक मिळवून दिले. महाराष्ट्र संघाने सांघिकच्या फायनलमध्ये ५०५.०७ गुणांसह रौप्यपदक आपल्या नावे केले. यजमान मध्य प्रदेश संघाने ५०७.२० गुणांसह सुवर्णपदक जिंकले. मुख्य प्रशिक्षक रवी कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघाने घवघवीत यश संपादन केले. आता महाराष्ट्राच्या ऋषभ, शार्दूल, समिक्षा आणि तनुश्री यांना वैयक्तिक गटात सुवर्णपदकाची संधी आहे.