मुंबई : ‘ कोरोनानंतर अर्थव्यवस्था सुधारत आहे. ‘ देखो अपना देश ‘ उपक्रमाने अनेक लोकांनी देशातील विविध पर्यटन स्थळे पाहिली. पर्यटनातून अर्थव्यवस्था सुधारत आहे. आजच्या बैठकीतून चांगल्या संकल्पना मिळाल्या, ‘ असे केंद्रीय संरक्षण आणि पर्यटन राज्यमंत्री अजय भट्ट यांनी सांगितले. मुंबईत आज पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून केंद्रीय संरक्षण आणि पर्यटन राज्यमंत्री अजय भट्ट यांनी टूर ऑपरेटर आणि आस्थापनांशी आज बैठक घेऊन संवाद साधला. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा, पश्चिम आणि मध्य विभागाचे प्रादेशिक संचालक वेंकटेशन दत्तात्रेयन आदी उपस्थित होते. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अजय भट्ट यांनी पर्यटन क्षेत्रातील क्रुझ टुरिझम, टूर ऑपरेटर, ट्रॅवल एजेंट असोसिएशन, ट्रॅवल मॅगझिन, अडवेंचर टूर ऑपरेटर, हॉटेल व्यावसायिक आदी आस्थापनांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधींच्या समस्या जाणून घेतल्या आणि बैठकीत चर्चा केली. त्यांनी त्या समस्या सोडवण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगितले. पर्यटन क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी मदत करणार असून आजच्या बैठकीत विविध संकल्पना मिळाल्याचे केंद्रीय राज्यमंत्री अजय भट्ट यांनी सांगितले. तसेच उपस्थित पर्यटन प्रतिनिधींना मार्गदर्शन केले.