मुंबई:मुंबईत पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येच्या निषेधार्थ मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ काळ्या फिती लावू मूक निदर्शनं करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर इथल्या पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली निर्घृण हत्या आणि गेल्या आठ दिवसात केज, मुखेड, धुळे आदी ठिकाणी पत्रकारांवर झालेले हल्ले आणि खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनांचा निषेधार्थ पुन्हा एकदा मुंबईतील पत्रकार एकत्र येत आपल्यामधील एकजुटीचं दर्शन घडविलं. आज मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ काळ्या फिती लावून निषेध नोंदविला. यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनात सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात भूमिका घेऊन पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जातो, पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो,पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्त्येचा खटला जलदगती न्यायालयामार्फत(फास्ट ट्रॅक) चालवावा, हत्या करणारा संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्याला मोक्का लावावा आणि हा खटला चालविण्यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करावे, मृत पत्रकार वारिशे यांची आर्थिक परिस्थिती पाहता त्यांच्या कुटुंबियांना सरकारने ५० लाखांची मदत द्यावी या मागण्यांसाठी संघटना आग्रही आहेत.
मराठी पत्रकार परिषद, मुंबई मराठी पत्रकार संघ, प्रेस क्लब मुंबई, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ,बीयुजे,क्राईम रिपोर्टर असोसिएशन, टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन,बृहन्मुंबई महापालिका पत्रकार संघ, म्हाडा पत्रकार संघ, एनयुजे महाराष्ट्र या पत्रकार संघटनांचे पदाधिकारी आणि नाणार रिफायनरी विरोधी कृती समितीचे पदाधिकारी आज झालेल्या मूक निदर्शनामध्ये सहभागी झाले होते.
पत्रकार संरक्षण कायदा आहे, मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ केली जाते. त्यामुळे महाराष्ट्रात निर्धोकपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे. या घटना सातत्यानं वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ मुंबईतील विविध पत्रकार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून मूक निदर्शने केली. वारीशे यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे. मात्र तो अपघात नसून घातपात आहे. हे उघड होत आहे आणि गाडीने ठोकर देत दुदैवी मृत्यू हा योगायोग नसून कटरचुन केलेला खुनच असल्याने या घटनेचा आम्ही मुंबईतील पत्रकारांनी तीव्र शब्दात निषेध नोंदविला.