मुंबई:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईतील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्याबाबत खासदार गोपाळ शेट्टी यांनी पत्र लिहिले आहे. मुंबईतील सामान्य नागरिक, आदिवासी लोक आणि झोपडपट्टीवासियांना पाणी जोडणी आणि शौचालय सुरळीत उपलब्ध व्हावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खासदार गोपाळ शेट्टी यांनी पत्र लिहून विनंती केली आहे.
‘आपण मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर महाराष्ट्रात आणि विशेषकरून मुंबई शहरातील विकास कामांना अधिकच गती आलेली दिसून येत आहे. आपल्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांतून मेट्रो रेल्वेच्या क्र. २ अ आणि क्र. ७ क्रमांकाची मेट्रो अंधेरीच्या पूर्व आणि पश्चिम विभागातुन सुरू झाल्यामुळं नागरीक मोठया प्रमाणावर त्याचा वापर करत आहेत आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यामध्ये नक्कीच मदत झाली असल्याचे मला स्वतःला दिसत आहे,’असं गोपाळ शेट्टी यांनी पत्रात नमूद केले आहे.
‘मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी सौंदर्यीकरणाची कामे सुरु असुनही कौतुकास्पद बाब आहे. मुंबई शहराचे वैभव वाढत आहे आणि ते वाढलेच पाहीजे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. परंतु एके ठिकाणी ही कामं होत असताना मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी आजही लोकांना पिण्याच्या पाण्याची जोडणी (कनेक्शन) तातडीनं उपलब्ध करून देत नाहीत. केंद्र सरकारने १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार महाराष्ट्र राज्याला ७०,३७५ कोटीची ग्रॅन्टची तरतूद केलेली असून मुंबई शहरातील लोक पाण्याचे पैसे भरायला तयार असतानाही महानगपालिका पाण्याची जोडणी देत नाही. माझ्या सारख्या एका ३१ वर्षे जनप्रतिनिधीत्व केलेल्या जनप्रतिनिधीलाही पाणी आणि शौचालयासारख्या मुलभुत सुविधा नागरीकांना मिळवण्यासाठी वॉर्ड ऑफीसला जावे लागते आणि तिथे गेल्यावरही अधिकारी त्याला प्रतिसाद देत नाहीत. तर दुसरीकडे शौचालयाची आवश्यकता आहे, तिथे शौचालय बांधले जात नाही, तर महानगरपालिकेचे अधिकारी बांधलेले शौचालय सोडुन पुन्हा नवीन बांधण्याचं काम करतात. म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी पैशाची उधळपट्टी करण्याचे काम काही अधिकारी करतात, हे बरोबर नाही आहे. जिथे शौचालय नाही, तिथे शौचालय बांधले पाहिजेत. ज्यांना पाण्याची जोडणी नाही, अशा आदीवासी पाडयामध्ये, झोपडपट्टीमध्ये महानगरपालिकेने स्व खर्चाने पाणी पोहोचवले पाहिजे. या विषयावर गांभीर्याने लक्ष घालून महापालिका आयुक्तांना योग्य ते आदेश निर्गमित करावे,’ अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खासदार गोपाळ शेट्टी यांनी पत्राद्वारे केली आहे.