मुंबई : केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांच्या हस्ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी गुंफातील सार्वजनिक विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी लोकसभा खासदार गोपाळ शेट्टी, भारतीय पुरातत्व विभागाच्या प्रादेशिक संचालक नंदिनी भट्टाचार्य, पुरातत्व सर्वेक्षण अधिकारी डॉ. राजेंद्र यादव, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक जी. मल्लिकार्जुन आदी मान्यवर उपस्थित होते.
बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी गुंफात केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांनी सार्वजनिक विकास सुविधांचे उद्धघाटन केले. केंद्र सरकारकडून बहुउद्देशीय सभागृह, ऐतिहासिक लेणी केंद्र, कान्हेरी लेण्यांची भव्य चित्रे, उपहारगृह, स्वच्छतागृह आणि प्राचीन तलावाचे पुनरुज्जीवन अशी अनेक कामे करण्यात आली.
‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अशा प्राचीन ऐतिहासिक वारशाचा विकास जतन व्हावा. मृत तलावाचे पुनरुज्जीवन व्हावे, ऐतिहासिक स्थळाचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास व्हावा, यासाठी आजच्या कान्हेरी गुंफाच्या विकासाचे काम सुरू आहे. आज बुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर बुद्धकालीन प्राचीन लेण्यांच्या विकास कामाचा शुभारंभ होणे ही एक आनंदाची बाब आहे,’ असे केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले.