मुंबई : ‘कलात्मक चित्रपट आणि लघुपट यांच्यासाठी आशियाई महोत्सव हे महत्वाचे व्यासपीठ आहे. हा महोत्सव अविरत सुरू रहावा,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी केले. १९ व्या आशियाई चित्रपट महोत्सवाच्या उद्घघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख आणि अभिनेते डॉ.मोहन आगाशे यांचा सत्कार करण्यात आला. चित्रपट संस्कृतीचा प्रसार करण्याचा ध्यास घेणारे सुधीर नांदगावकर यांना सत्यजित राय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आशियाई महोत्सवाचे अध्यक्ष किरण व्ही शांताराम यांनी स्वागतपर भाषण केले. सांस्कृतिक खात्याचे संचालक बिभीषण चवरे यावेळी उपस्थित होते. डॉ.संतोष पाठारे यांनी कार्यक्रमाचं सूत्र संचालन आणि महोत्सवाचे प्रभारी संचालक संदीप मांजरेकर यांनी आभार प्रदर्शन केले.
थर्ड आय आशियाई महोत्सवात १२ ते १८ डिसेंबर २०२२ दरम्यान पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत इराण, बांगलादेश, श्रीलंका अशा विविध आशियायी देशांमधील आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले तीस चित्रपट प्रदर्शित केले. महोत्सवाचा शुभारंभ सरथ कोथालावाल आणि कुमारा थिरीमदुरा दिग्दर्शित ‘द न्यूजपेपर’ या श्रीलंकन सिनेमाने झाला. सांगता समारंभात अनिक दत्ता दिग्दर्शित अपराजितो हा चित्रपट दाखवण्यात आला. कंट्री फोकस विभागात सहा श्रीलंकन चित्रपट प्रदर्शित केले असून प्रथमच गुजराती चित्रपटांचा विशेष विभाग या महोत्सवात करण्यात आला. राष्ट्रीय पुरस्कार विजेता हेल्लारो हा अभिषेक शहा दिग्दर्शित चित्रपट या विभागाचे खास आकर्षण ठरला आहे. धाड,२१ एम यु टिफिन , रेवा , आ छे मारू गाव हे गुजराती चित्रपट या विभागात समावेश केला. बंगाल ,मणिपूर ,आसाम ,गोवा येथे निर्माण झालेले डिक्शनरी ,स्तेलोन माय पोनी , गॉड ऑन द बाल्कनी, केजरो या प्रादेशिक चित्रपटांचा समावेश महोत्सवात असून फनरल, गोदाकाठ , काळी माती, भारत माझा देश आहे, फास हे मराठी चित्रपट देखील प्रदर्शित केले गेले. दिवंगत दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांना श्रद्धांजली म्हणून डॉ. संतोष पाठारे दिग्दर्शित सुमित्रा भावे एक समांतर प्रवास हा माहितीपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला.
या महोत्सवात इराण, श्रीलंका, मलेशिया, युनायटेड स्टेट्स, बांगलादेश, मराठी, बंगाली, आसामी, कोंकणी, गुजराती, पंजाबी, हिंदी, इंग्रजी अशा विविध भाषांमधील आणि देशांमधून मोठ्या प्रमाणात फिचर आणि शॉर्ट फिल्म च्या इंट्री आल्या होत्या. त्यामधून निवडक ३५ फिचर फिल्म आणि ३० लघुपटांचे प्रदर्शन या महोत्सवात करण्यात आले.
या महोत्सवात लघुपटांपैकी इराणच्या ‘ओपन सिजन’ या मोहम्मद हसानी दिग्दर्शित लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. द्वितीय पारितोषिक मयुर धामापुरकर दिग्दर्शित ‘मोगरा’ या मराठी लघुपटाला देण्यात आले. मोहम्मद अब्बासी दिग्दर्शित ‘रेड पेन’ या इराणी लघुपटाला ज्युरी चा विशेष पुरस्कार देण्यात आला. चित्रपट समीक्षक मीना कर्णिक आणि दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी ज्युरी म्हणून काम पाहिले.मुंबईमधल्या चित्रपट रसिकांसाठी आशिया खंडातील समकालीन चित्रपट पाहण्याची संधी या महोत्सवाच्या माध्यमातून चित्रपट रसिकांना मिळत असते.