मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळते. मात्र विधानसभा आणि लोकसभेत ही ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असल्याचे सांगत रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वात देशभर एस सी, एस टी आणि ओबीसींची एकजूट करणार असल्याची गर्जना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. ओबीसी समाजाच्या विविध मागण्या घेऊन रिपब्लिकन पक्षातर्फे हैद्राबादमधील रवींद्र भारती सभागृहामध्ये इतर मागासवर्गीय समाजाचे (ओबीसी) गर्जना संमेलन घेण्यात आले.त्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले बोलत होते. यावेळी तेलंगणा राज्यातील विविध इतर मागासवर्गीय समाजाचे (ओबीसी) संघटना आणि निष्पक्ष असणाऱ्या इतर मागासवर्गीय समाज (ओबीसी) समन्वय समितीतर्फे रामदास आठवले यांचा सत्कार करण्यात आला. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा ओबीसींमधून आलेले लोकप्रिय पंतप्रधान लाभले असून त्यांच्याकडून ओबीसी समाजाला मोठ्या अपेक्षा असून त्या पूर्ण होतील असे रामदास आठवले यांनी ओबीसी संघटनांना आश्वासन दिले. यावेळी लोकप्रिय शाहीर गदर, रिपब्लिकन पक्षाचे परम केशव नागेश्वराव गौड,ब्रह्मानंद रेड्डी,कोमपल्ली प्रभूदास,गोरख सिंग,रोझा आदी मान्यवर उपस्थित होते.
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे देश एकसंघ केला आहे. आरक्षणाचा हक्क दिला आहे. मंडल कमिशनची अंमलबजावणी करावी, यासाठी आम्ही भारतीय दलित पँथरतर्फे अनेक वर्षे लढा दिला, यावेळी याची आठवण रामदास आठवले यांनी करून दिली. देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. ओबीसींना मिळणाऱ्या २७ टक्के आरक्षणात वर्गवारी करण्यात यावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात ओबीसींना न्याय मिळेल. माझ्या सामाजिक न्याय मंत्रालयाअंतर्गत ओबीसी फायनान्स कॉर्पोरेशन कार्यरत आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा दिली जात आहे. रुपये ७ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही प्राप्तिकर लागणार नाही. गरिबांना अन्नधान्य मोफत दिले जाणार आहे. ओबीसींच्या विकासासाठी मोदी सरकार कार्यरत असून मोदींच्या नेतृत्वात देशात ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ जिंकण्यासाठी मोदींचे काम चालू आहे.देशाला ऍक्टिव्ह ओबीसी पंतप्रधान मिळाल्याचे गौरवोद्गार रामदास आठवले यांनी काढले. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती केले असले, तरी त्यातून काही चमत्कार घडणार नाही. त्यांचा संपूर्ण भारतात पक्ष चालणार नाही. मात्र संपूर्ण भारतात पंतप्रधान मोदींचे नेतृत्व लोकप्रिय असून आगामी विधानसभा निवडणुकीत तेलंगणामध्ये मोदींच्याच नेतृत्वाची जादू चालणार आहे. केसीआर यांच्या हातून तेलंगणाची सत्ता जाणार आहे असे रामदास आठवले म्हणाले.
ओबीसी गर्जना संमेलनास उपस्थित रहिलेले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे रिपब्लिकन पक्षातर्फे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर तेलंगणातील नृत्य आणि दांडिया नृत्य सादर करून रामदास आठवले यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे आंध्रप्रदेश अध्यक्ष ब्रह्मानंद रेड्डी यांनी दांडिया नृत्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. दांडियाच्या तालावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हाती दांडिया घेऊन ठेका धरला आणि सभागृहात उत्साहाचे आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी तेलंगणा टॅक्सी चालकाच्या शिष्टमंडळाने ओला उबेर ही सेवा परदेशी असून त्यामुळे ती रद्द करण्याची मागणी केली. यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन रामदास आठवले यांनी दिले. यावेळी तेलंगणाचे माजी मंत्री इठ्ठल यांनी ओबीसीबाबत आपले विचार मांडून रामदास आठवले यांचे स्वागत केले. तसेच तेलंगणाचे ज्येष्ठ दलित नेते आणि राज्यसभा खासदार कृष्णय्या यांनी रामदास आठवले यांचे भव्य स्वागत केले.