मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई झोपडपट्टीतील प्रलंबित पहिला माळा प्रकरणी खासदार गोपाळ शेट्टी यांनी पत्र लिहिले आहे. खासदार गोपाळ शेट्टी यांनी सातत्याने झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पाठपुरावा केला असून झोपडपट्टी पुनर्वसन होताना पहिल्या माळावर योग्य पुराव्याचा आधारावर त्या रहिवाशांनाही घर देण्यात यावे, यासाठी खासदार गोपाळ शेट्टी यांनी अनेक स्तरावर प्रयत्न केले आहेत. याबाबत लोकसभेतही खासदार गोपाळ शेट्टी भाष्य केले आहे.
‘पदपथावर राहणारे बेघर व्यक्तीदेखील माणसे आहेत. ते गरीब किंवा कमी नशीबवान असू शकतात. पण तरीही ती माणसे आहेत आणि त्यामुळेच न्यायालयासमोर ती सुद्धा इतरांसारखीच आहेत. बेघरांची समस्या ही केवळ मुंबई किंवा देशापुरती मर्यादित नाही, तर ती जागतिक समस्या आहे, पदपथावर राहणाऱ्या व्यक्तीदेखील माणसे आहेत. त्यामुळे त्यांना हटवण्याचे आदेश दिले जाऊ शकत नाहीत, अशा प्रकारचा आदेश देण्यात आल्याचे वाचून आजही लोकशाहीत सर्वसामान्य माणसांची कदर जिवंत आहे यांचा आनंद तर मला झालाच. परंतु त्याच बरोबर मुंबई शहरातील खासगी जमिनीवर जमीन मालकांकडून पैसे देऊन विकत घेतलेले पहिल्या माळ्यावरील हजारो लोकांना एस आर ए मधील कायद्यातील तरतुदी आणि त्रुटींमुळे बेघर करण्यात आल्याचे जगजाहीर आहे.
मुंबई झोपडपट्टीतील प्रलंबित पहिला माळा प्रकरण मी गेली अनेक वर्षांपासून सरकार दरबारी हाताळत असून तसेच उच्च न्यायालयात ही खटले दाखल केले आहेत. एकीकडे उच्च न्यायालय देखील अशा प्रकारचा खटल्याचा निकाल तातडीने लावण्याचे सोडून अनेक वर्षे खटले प्रलंबित असतात, तर दुसरीकडे काही तथाकथित एन जी ओ मार्फत खटले दाखल करण्यात आले असल्यास तातडीने त्याच्यावर अंमलबजावणी होत असते हे देखील आपण अनेक वेळा पाहिले आहे.
असो, न्यायालयाच्या माध्यमातून अनेक प्रश्न यामागेही सुटले आहेत, आताही सुटत आहेत आणि यापुढेही सुटणार आहेत आणि म्हणून सर्व न्याय निर्णय न्यायालयाच्या मार्फतच होत असतील, तर लोकप्रतिनिधी व्यवस्थेचा येणाऱ्या काळात कुठेतरी दबादबा किंवा सन्मान कमी होईल असे मला वाटते आणि म्हणून निवडणुकीद्वारे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा ही मान सन्मान, आदर ही कमी होण्याची संभावना आहे आणि म्हणून प्रलंबित पहिल्या माळ्यावरील प्रकरण तातडीने मार्गी लावण्यात यावे अशी माझी आपल्याकडे पुन्हा एकदा मागणी आहे.’ असे खासदार गोपाळ शेट्टी यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.