मुंबई : ‘चैत्रचाहूल’चं हे सोळावं वर्ष. अॅड फिझ सादर करत असलेली ‘चैत्रचाहूल’ या वर्षी विवेक व्यासपीठाच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. मराठी नववर्षाच्या शुभेच्छा मराठी संस्कृतीचा जागर करून द्याव्यात असं ठरवून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. मराठीपण, मराठी बाणा जपत मराठीची महती सांगणं, त्यासाठी मराठी जनांना एकत्र आणणं आणि शुभेच्छांसह एकत्र आनंद साजरा करणं यासाठी ही ‘चैत्रचाहूल’! मराठी साहित्य-संगीत आदीचा आगळा मनोरंजक आविष्कार सादर करताना आम्ही सामाजिक भानही जाणीवपूर्वक राखले आहे. सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात निरलस योगदान देऊन आपलं जीवन समृद्ध करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, आम्हाला महत्त्वाचं वाटतं. एक ध्यास घेऊन आपलं जगणं समाजाला समर्पित करणाऱ्या व्यक्तींसाठी ‘ध्याससन्मान’ आणि आपल्या कलेद्वारे भरीव योगदान देणाऱ्या कलावंतांना ‘रंगकर्मी सन्मान’ देऊन त्यांचा यथाशक्ती सन्मान करणं हे चैत्रचाहूलचं वैशिष्ट्य आहे.
गेल्या पंधरा वर्षांत अरुण होर्णेकर, संजना कपूर, गणपत म्हसगे, चंद्रकांत काळे, माधुरी पुरंदरे, अरुण काकडे, कांचन सोनटक्के, अविनाश गोडबोले, ओमप्रकाश चव्हाण, सुधीर नांदगावकर यांना ‘ध्याससन्मान’ आणि मुक्ता बर्वे, प्रदीप मुळे, प्रसाद ओक, विजय केंकरे, विजयकुमार नाईक, चंद्रकांत कुलकर्णी, दत्ता पाटील, अजित भगत, विश्वास सोहनी यांना ‘रंगकर्मी सन्मान’ प्रदान करण्यात आले आहेत. तसेच सुलभाताई देशपांडे, गुरू पार्वतीकुमार, राजा मयेकर, प्रा.मधुकर तोरडमल, प्रा.शंकर वैद्य, सुलोचना चव्हाण यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांना सन्मानित करण्यात आले. प्रताप करगोपीकर, प्रा. वामन केंद्रे, अभिराम भडकमकर, प्रकाश खांडगे, सुनील शानभाग, संध्या पुरेचा या मान्यवरांचा यथोचित गौरव ‘चैत्रचाहूल’च्या व्यासपीठावर करण्यात आला. या वर्षी ‘ध्याससन्मान’ विद्याधर निमकर यांना तर ‘रंगकर्मी सन्मान’ फैय्याज शेख यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक महेंद्र पवार यांनी दिली आहे.
“चैत्रचाहूल” हा मराठी नववर्षाच्या स्वागताचा आनंदसोहळा बुधवार दिनांक २२ मार्च २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता दादरच्या श्री. शिवाजी नाट्य मंदीर येथे रसिकांच्या साक्षीने करण्यात येणार्यान या दोन सन्मानांमुळे अधिकच आनंददायी होणार आहे.