मुंबई : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स, (सीआयसीएसई) या केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई (दहावी) आणि आयएससी (बारावी) परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. आयसीएसई (दहावी) बोर्डाचा निकाल हा ९८.९४ टक्के लागला आहे. तर आयएससी (बारावी) बोर्डाचा निकाल ९६.९३ टक्के लागला आहे.
आयसीएसईच्या (दहावी) निकालामध्ये मुलींनी चांगली कामगिरी बजावली असून यात मुलींचे पास होण्याचे प्रमाण ९९.२१ टक्के आहे तर मुलांचे पास होण्याचे प्रमाण ९८.७१ टक्के आहे. तसेच आयएससीच्या (बारावी) निकालांमध्ये ही मुलींनी बाजी मारली असून ९८.०१ टक्के मुली पास झाल्या आहेत तर मुलांचे पास होण्याचे प्रमाण ९५.९६ टक्के आहे.
आयसीएसईच्या (दहावी) निकालांमध्ये भारतात पश्चिम भागातील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक असून या भागातील ९९.८१ टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. या पाठोपाठ दक्षिण भागातील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ९९.६९ टक्के आहे. आयएससीच्या (बारावी) निकालांमध्ये दक्षिण भागातील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक असून या भागातील ९९.२० टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. या पाठोपाठ पश्चिम विभागातील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ९८.३४ टक्के आहे.
मार्च आणि फेब्रुवारी महिन्यात या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यावर्षी सुमारे तीन लाख विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसले होते, जे निकालाची वाट पाहत होते. अखेर आज दुपारी तीन वाजता निकाल जाहीर झाले.
जर विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांबाबत काही आक्षेप असल्यास ते पुन्हा तपासणीसाठी अर्ज करु शकतात. ही सुविधा २१ मे पर्यंत उपलब्ध राहिल. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.