मुंबई : वर्ष २०२५ पर्यंत मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनच्या (एमएमआर) पश्चिम उपनगरांमधल्या स्थावर मालमत्तांच्या मागणीमध्ये लक्षणीयरित्या वाढ होईल असा विश्वास स्थावर मालमत्ता क्षेत्रातल्या आघाडीच्या तज्ज्ञांना वाटत आहे. सध्याचा उर्ध्वगामी आलेख पाहता, ही उपनगरं २०२३ मध्ये एमएमआरच्या विक्रीमध्ये ५० टक्क्यांहून बाजारहिस्सा मिळवतील अशी चिन्हं दिसत आहेत.
पश्चिम उपनगरांनी एमएमआरच्या विक्रीमध्ये लक्षणीय बाजारहिस्सा मिळवण्यामागे अनेक घटक आहेत. उदा. पायाभूत सेवा प्रकल्पांचा विकास ज्यामुळे ही ठिकाणं घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी तसंच गुंतवणुकदारांसाठी अत्यंत आकर्षक बनली आहेत. त्याचबरोबर वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) आणि ओशिवरा डिस्ट्रिक्ट सेंटरसारख्या (ओडीसी) प्रस्थापित आणि नवोदित रोजगार केंद्रांची उपलब्धता, जीवनशैलीपूरक सुविधांची उपलब्धता आणि दक्षिण मुंबईतल्या व्यावसायिक क्षेत्रांशी असलेली तुलनेने सोपी कनेक्टिव्हिटी या घटकांचा समावेश होतो. येत्या काही वर्षांमध्ये पश्चिम उपनगरांच्या बाजारहिश्श्याचा संभाव्य प्रगतीशील आलेख याप्रकारेच वाढत राहण्याची शक्यता आहे.
सध्या चालू असलेला पायाभूत सुविधा विकास आणि निवासी तसंच व्यावसायिक मालमत्तांची वाढती मागणी हे या वाढीसाठी कारणीभूत असलेले प्रमुख घटक आहेत. किंबहुना मुंबईतल्या एका मोठ्या मालमत्ता सल्लागार भागीदारांपैकी एक असणाऱ्या पलाडिअन पार्टनर्सच्या मते, काही संभाव्य आव्हानं पुढे येण्याची शक्यता आहे.
पलाडिअन पार्टनर्सच्या चंद्रेश विठलानी यांच्या मते, ‘भविष्यातल्या विकासासाठी जमिनीची मर्यादित उपलब्धता ही पश्चिम उपनगरांसाठी एकप्रकारे एक संधीच आहे. त्यासाठी त्यांनी जमिनीचा शाश्वत आणि प्रभावी वापर करण्यावर भर दिला पाहिजे. जेणेकरून उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर करत असताना त्याच्या अभिनव लँडस्केपला धक्का बसणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. मागणी वाढत असताना पश्चिम उपनगरं अफोर्डेबिलिटीच्या समस्या सोडवताना धोरणात्मकरित्या विचार करून त्यावर तोडगे काढू शकतात. यासाठी हाऊसिंग उपक्रम, हाऊसिंग संस्थांबरोबर भागीदारी करणं आणि अभिनव फायनान्सिंग तोडगे शोधणे अशा मार्गांचा अवलंब करू शकतात. धोरणं आणि नियमांमध्ये बदल किंवा सरकारी हस्तक्षेपामुळे सातत्याने सुधारणा आणि नवीन गोष्टींचा अवलंब यासाठी उत्तम संधी आहेत. त्यामुळे पश्चिम उपनगरांमधल्या स्थावर मालमत्ता बाजारपेठेला गुंतवणूकदार तसंच खरेदीदारांच्या वाढत्या आणि बदलत्या गरजांनुसार सतत बदलता येईल.’
चंद्रेश विठलानी म्हणाले की, ‘पश्चिम उपनगरांमध्ये विशिष्ट प्रकारच्या मालमत्ता किंवा विभाग लक्षणीयरित्या संपन्न झाले आहेत. आलिशान निवासी मालमत्ता विभागाने लक्षणीय वाढ नोंदवली आहे. उत्तम जीवनशैली आणि सोयीसुविधा देणाऱ्या हाय-एंड अपार्टमेंट्सच्या विकासामुळे ही वाढ दिसत आहे. एका महिन्यात केवळ १० दिवसांच्या कालावधीत आम्ही ४०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांची विक्री केली आहे, यावरूनच त्याची प्रचिती येते.’
या विषयावर बोलताना एनएआर इंडियाचे उपाध्यक्ष प्रवीण फणसे म्हणाले, ‘मागणीमधली संभाव्य वाढ आणि पश्चिम उपनगरांचा बाजारहिस्सा याकडे पाहता, भविष्यात मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये (एमएमआर) स्थावर मालमत्ता क्षेत्राला भरपूर संधी मिळतील आणि विकासालाही चांगला वाव आहे. महत्त्वपूर्ण ठिकाणी असलेले भागधारक या संधीचा फायदा घेतील आणि त्यातून विकास घडवतील. बदलती परिस्थिती आणि एकत्रित प्रयत्नांच्या आधारे भागधारक या उर्ध्वगामी आलेखाचा योग्य तो फायदा करून घेतील आणि गुंतवणूक, अभिनव प्रयोग आणि शाश्वत विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करतील. एकत्रितपणे ते पश्चिम उपनगरांचं भवितव्य घडवतील आणि संपूर्ण एमएमआरला उल्लेखनीय विकासाच्या दिशेने घेऊन जातील.’