दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. यानिमित्ताने आठवडाभर चालणाऱ्या कायाक्रमा अंतर्गत नवजात बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी स्तनपानाच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.
असं म्हणतात की आईला कधीच सुट्टी नसते, आपल्यापैकी बहुतांश जण या मताशी सहमत आहोत. बाळाचा डायपर बदलणं असो त्याला भरवणं असो, त्याला झोपवणं असो किंवा त्याची काळजी घेणं असं आई मुलांसाठी आपले सगळे कष्ट विसरून या सगळ्या गोष्टी करत असते. हे सगळं करून थकल्या-भागलेल्या आईच्या चेहऱ्यावरील हसू कधीही ढळलेलं पाहायला मिळत नाही. बाळाची काळजी घेण्यासोबतच आईला घरची कामेही करावे लागतात. ही सगळी कसरत करणं सोपं नसतं, खासकरून जेव्हा नवजात बाळाची आई बाळाला स्तनपान करत असते. कारण काय आहे माहिती आहे? कारण आहे गैरसमजुती. स्तनपानामुळे स्तन गळतात, स्तनपान करणाऱ्या महिलेला चव नसलेलं अन्न खावं लागतं अशा बऱ्याच गैरसमजुती पसरवल्या जातात. याचा परिणाम असा होतो की बाळाची आई कितीही प्रयत्न केले तरी या गैरसमजुतींना बळी पडते. यासाठी जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने – मुंबई सेंट्रल वोक्हार्ड रुग्णालयाच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.गांधाली देवरूखकर यांनी गैरसमजूती दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
पहिली गैरसमजूत: स्तनपानाच्या काळात गर्भधारणा होत नाही.
– सत्य हे आहे कि तुम्ही स्तनपान करत असला तरी प्रसुतीनंतर ३ महिन्यांनी पुन्हा गर्भधारणा होण्याची शक्यता असते. त्यामुळे गर्भनिरोधाच्या पर्यायांसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी सुरक्षित पर्याय उपलब्ध आहेत.
दुसरी गैरसमजूत: स्तनात दुधाच्या गाठी झाल्यास त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नये.
– सत्य हे आहे कि ही बाब चुकीची असून स्तनाच्या नसा साकळल्या असतील तर त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. ही काळजी घेत असताना स्तनांना गरम पाण्याने शेकणं किंवा त्यांना हलक्या हाताने मसाज करणं फायदेशीर ठरतं. याकडे दुर्लक्ष केल्यास संसर्ग होण्याची शक्यता असते. जर हा संसर्ग झाला तर स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. स्तनामध्ये गळूसदृश्य गाठ झाली तर त्यावर शस्त्रक्रिया करावी लागण्याची शक्यता असते.
तिसरी गैरसमजूत: स्तनपानानंतर तुमचे स्तन कायमचे गळतात.
– सत्य हे आहे कि गर्भारपणात स्तनांचे वजन दुपटीने वाढते. तुम्ही स्तनपान करा अथवा करू नका, स्तनाच्या वाढलेल्या वजनामुळे स्तनांना घट्ट ठेवणाऱ्या लिगामेंटवर ताण येतो. हा ताण जेवढा वाढत जातो तेवढए स्तन गळतात. तुमचे वय, बीएमआय, गर्भारपणापूर्वीची तुमची ‘ब्रा’ची साईझ या सगळ्या गोष्टींचा ताण वाढण्यावर किंवा लिगामेंट कमजोर होण्यावर परिणाम होऊ शकतो.
चौथी गैरसमजूत: स्तनपान करणाऱ्या महिलेने बेचव अन्न खावे, चमचमीत खाद्यपदार्थ खाऊ नये.
– सत्य हे आहे कि स्तनपान करणारी महिला जे अन्न खाते ते पचून त्याचा वापर बाळासाठी दूध करण्यात होईपर्यंत त्या खाद्यपदार्थातील बरे-वाईट घटक हे पचलेले असतात आणि त्याचा बाळावर कोणताही परिणाम होत नाही. उदा. तुम्ही जर कोबी किंवा ब्रोकोली सारखे पदार्थ खाल्ले तर तुमच्या बाळाला गॅसची समस्या होणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी बदलू नका. मात्र भरपूर पाणी प्यायले जाईल याकडे लक्ष ठेवा.
पाचवी गैरसमजूत: डार्क बिअर प्यायल्याने जास्त दूध निर्माण होतं.
– सत्य हे आहे कि याला कोणताही शास्त्रीय आधार नाहीये. खरं पाहता, अति दारू प्यायल्याने शरीरातील प्रोलॅक्टीन पातळी कमी होते. हे एक प्रकारचे संप्रेरक म्हणजेच हार्मोन असून त्यावर मातेच्या शरीरातील दुधाचे प्रमाण अवलंबून असतं. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे की, स्तनपान करणाऱ्या महिलांनी दारू पिणं टाळलं पाहिजे.
राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण ४ नुसार, ३ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या ४१.६% मुलांना जन्माच्या एका तासाच्या आत स्तनपान देण्यात आले, तर ६ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या ५४.९% बालकांना फक्त स्तनपान देण्यात आले आणि ३८.४ % पाच वर्षाखालील बालकांना पुरेशा प्रमाणात स्तनपान मिळाले नाही.
नवजात बालके, मुले आणि माता यांच्यासाठी स्तनपानाचे अनेक आरोग्य फायदे आहेत आणि हे सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी मुख्य कारण बनते. अमेरिकन लोकांसाठी २०२०-२०२५ सालासाठीची आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वे (आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वे) आणि अमेरिकन ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्समध्ये (AAP) बाळांना पहिले ६ महिने फक्त स्तनपान द्यावे असे सांगण्यात आले आहे.
– डॉ.गांधाली देवरूखकर
स्त्रीरोग तज्ज्ञ
वोक्हार्ड रुग्णालय, मुंबई सेंट्रल