मुंबई : २०२८ मध्ये अमेरिकेच्या लॉस एंजेलिस शहरात होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये मल्लखांब या भारतीय खेळाचा प्रदर्शनीय क्रीडा प्रकार म्हणून समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर युएसए मल्लखांब महासंघानं संस्थापक चिन्मय पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली जर्मनी आणि कॅनडामध्ये दौरे करीत तेथील प्रचार, प्रसार आणि प्रशिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
काही महिन्यांपूर्वी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत युएसए मल्लखांब महासंघानं आपल्या ऑलिम्पिक मोहिमेची महती सांगितली होती. त्यानंतर जागतिक पातळीवर त्या दृष्टीने झालेल्या प्रयत्नांबाबत युएसए मल्लखांब महासंघाचे संस्थापक चिन्मय पाटणकर म्हणाले, ‘जागतिक मल्लखांब संघटनेची मान्यता असलेले सहा-सात देश आहेत. पण भारत आणि अमेरिका वगळता अन्य राष्ट्रांची प्रचार-प्रसाराची कार्ये मर्यादित आहेत. पण ऑलिम्पिकमधील प्रदर्शनीय खेळ हा दर्जा मिळाल्यापासून आम्ही झपाट्यानं काम करतो आहे. विविध देशांमधील मराठी मंडळे, हिंदू संस्था, ढोल-ताशे पथक आदी धागे पकडून आम्ही त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करीत आहोत. याचाच महत्त्वाचा भाग म्हणून आम्ही कॅनडा आणि जर्मनीचे यशस्वी दौरे केले. कॅनडा दौऱ्यासाठी गणेशोत्सवाचा कालखंड आम्ही निश्चित केला. ओटावा येथील राष्ट्रीय मल्लखांबपटू अमित तुंगारे यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. बऱ्याच लोकांनी मल्लखांब पाहिलेला नव्हता. त्याविषयीच्या माहितीला दिशा नव्हती. गेल्या ३०-४० वर्षांमधील मल्लखांबाच्या क्रांतीची माहिती आम्ही त्यांच्यापुढे उलगडली. ८ ते ५० वर्षे वयाच्या लोकांना मल्लखांबाच्या प्रवाहात सामील करण्याचे आमचे महत्त्वाचे लक्ष्य होते.’
चिन्मय पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेतील मुला-मुलींच्या पथकांनी ओटावा येथे बसने प्रवास केला. तिथे केलेल्या दोन दिवसांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी थक्क होऊन दाद दिली. जवळपास १,५०० जणांनी या प्रात्यक्षिकांना उपस्थिती राखली. यात १,२०० कॅनडाचे आणि तीनशे भारतीय नागरिकांचा समावेश होता.
कॅनडाच्या नेपीन शहरातील संसदेचे सदस्य चंद्रा आर्य यांनी यावेळी पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील यूएसए मल्लखांब महासंघाचा सत्कार केला आणि त्यांना सन्मानचिन्ह बहाल करण्यात आले. २०२८च्या ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर युएसए मल्लखांब महासंघाच्या या मोहिमेची आर्य यांनी प्रशंसा केली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. स्कायरूट मीडियाच्या सहसंस्थापिका वीणा पवार यांच्या नेतृत्वाखाली जर्मनीत मल्लखांब प्रसार अभियानाला उत्साहाने प्रारंभ झाला आहे. म्युनिक, स्टुटगार्ड, डूझेलडॉर्फ, फ्रँकफूट या शहरांमध्ये झालेल्या मल्लखांबाच्या प्रात्यक्षिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शहरांमध्येही गणेशोत्सवाच्या काळाची निवड करण्यात आली. याबाबत वीणा पवार म्हणाल्या, ‘जर्मनीत मल्लखांब सादर करण्यासाठी आम्ही खास पोलंडहून मल्लखांब मागवला. तेथील प्रशिक्षक ओमकार परांजपे यांचे सहकार्य त्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरले. प्रसाद भालेराव, अजित रानडे, योगेश वाडकर या जर्मनीमधील मराठी माणसांनी मल्लखांब प्रात्यक्षिके व्हावीत, या हेतूने अप्रतिम सहकार्य केले. अमेरिकेच्या पथकाने केलेले मल्लखांबाच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण डोळ्यांचे पारणे फिटणारे होते. हा प्रतिसाद अनपेक्षित असाच होता. आमच्या मुलांनाही मल्लखांब हा क्रीडा प्रकार शिकवा, अशी मागणी जोर धरू लागली. त्या दृष्टीने आम्ही योजना आखतो आहोत.’
‘ मल्लखांब प्रचार मोहिमेची पुढील वाटचाल जोमाने सुरू आहे. लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आम्ही कृती आराखडा तयार केला आहे. पाच युरोपियन, पाच आशियाई आणि पाच अमेरिका खंडांमधील देशांपर्यंत मल्लखांब क्रीडा प्रकार पोहोचवण्याचे लक्ष्य यशस्वी झाल्यावरच आम्ही आफ्रिका खंडातील कार्य हाती घेऊ,’ असे यूएसए मल्लखांब महासंघाचे प्रमुख चिन्मय पाटणकर यांनी सांगितले.
‘जर्मनीच्या शेजारील राष्ट्र असलेल्या नेदरलँड्समध्येही मल्लखांब प्रसारासाठी आम्ही दौरा करणार आहोत. पराग वर्तक, ओमकार परांजपे आणि निधी जोशी यांचे मार्गदर्शन तिथे महत्त्वाचे ठरेल. तिथे आम्ही रोप मल्लखांबाकडे प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करणार आहोत,’ असे स्कायरूट मीडियाच्या सहसंस्थापिका वीणा पवार यांनी सांगितले.