उमेश घळसासी
“वीर सावरकरांनी आपले संपूर्ण आयुष्य कुटुंबासहित देशकार्यासाठी अर्पण केले. त्यामुळे त्यांचे कार्य समाजासमोर आलेच पाहिजे. “वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स’ या वेबसीरिजच्या माध्यमातून इतिहासाला अवगत असणारे, उपलब्ध असलेले पुरावे तार्किक दृष्टीने मांडता येतील आणि त्यातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्व जसे होते तसेच मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे या वेबचे दिग्दर्शक योगेश सोमण यांनी सांगितलं. ‘वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स’ या पहिल्या हिंदी वेबसीरिजच्या चित्रीकरणाचा प्रारंभ, भोर इथल्या राजवाड्यात घटस्थापनेच्या मुहूर्तावर झाला. त्यावेळी सोमण बोलत होते.
आजपर्यंत सावरकर यांच्यावर आधारित नाटक, चित्रपट आले. परंतु वेब सीरिजच्या माध्यमातून प्रथमच ही मालिका प्रेक्षकांसमोर येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संपूर्ण जीवनावर हिंदी भाषेतील चार सीझनमध्ये ही वेबसिरीज असणार आहे. पहिल्या सिझनमध्ये सावरकर यांच्या जन्मापासून म्हणजे १८८३ ते मार्सेलिस इथे समुद्रात उडी मारण्यापर्यंतचा कालखंड पाहता येईल, असे दिग्दर्शक योगेश सोमण यांनी सांगितले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्यांना केवळ उत्तर देण्यासाठी आमचे नॅरेटिव्ह नाही. सावरकर यांचे जीवन हा जवळपास १०० वर्षांचा इतिहास आहे. यातून लोकांनी त्यातून प्रेरणा घ्यावी, लोकांचे गैरसमज दूर व्हावे, राजकीय, सामाजिक स्वार्थांसाठी तयार केले जाणारे नॅरेटिव्ह पुसले जावे, असा आमचा प्रयत्न असणार आहे. “छत्रपति शिवाजी महाराज” यांच्या व्यतिरिक्त सावरकर यांचे कुणीही गुरु नव्हते…एकलव्यासारखी त्यांची वाटचाल आहे. सावरकर जन्मतः नेते होते. सिक्रेट फाईल्स म्हणजे सावरकरांचे व्यक्तिमत्व जे लोकांना माहित नाही ते अनफोल्ड करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असेही योगेश सोमण यांनी स्पष्ट केलं…
“सावरकर हे जन्मतः क्रांतिकारी होते. त्यांचे खरेखुरे व्यक्तिमत्व समाजासमोर येण्याची गरज होती. कारण सेल्युलर जेल, कोलू ओढला, त्यांनी बोटीतून मारलेली उडी एवढेच लोकांना माहित आहे. मात्र, स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे योगदान, त्यांनी केलेला त्याग यांच्याबद्दलचे वास्तव कुणालाच माहिती नाही. त्यांचे जीवनकार्य संपूर्ण देशाला माहित व्हावे यासाठी हिंदी भाषेत ही वेबसिरीज समोर आणत आहोत. लोकांनी या वेब सीरिजला भरभरून प्रतिसाद द्यावा आणि सावरकर समजून घ्यावेत अशी अपेक्षा आहे. सावरकर यांच्या जीवनावर आधारित कलाकृती सादर करावी हे माझे स्वप्न होते, ते या वेब सीरिजच्या निमित्ताने पूर्ण होणार आहे”, असे या वेबचे निर्माते डॉ. अनिर्बान सरकार यांनी सांगितले.
यावेळी या वेब सीरिजचे लेखक दिग्दर्शक योगेश सोमण, निर्माते आणि डेक्कन ग्रुपचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. अनिर्बान सरकार, डेक्कन ए व्ही मीडियाचे संचालक अजय कांबळे,प्रॉडक्शन हेड साची गाढवे, सिनेमॅटोग्राफर प्रसाद भेंडे, प्रोडक्शन डिझायनर, सिद्धार्थ तातूसकर,कला दिग्दर्शक महेश कोरे आदी उपस्थित होते.
लेखक – दिग्दर्शक: योगेश सोमण
निर्माते : डॉ. अनिर्बान सरकार