नवी मुंबई: मानवी मनाची घालमेल, प्रेमभावना,भूतकाळातील कडवसे,आठवणींच्या हिंदोळ्यावर घेतलेले झोके या नितळ,प्रेमळ,निरागस भावनेला हवेच्या मंद झुळूकाप्रमाणे स्पर्श करणारे आणि हळुवारपणे हद्ययालाही स्पर्शून जाणारे वऱ्हाडी आर्टस प्रस्तुत बहुचर्चित ‘एक होडी कागदाची’ हे गीत आज मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आले. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी प्रा. अशोक बागवे, ज्येष्ठ कवी सतीश सोळांकुरकर, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र पोखरकर, शिवव्याख्याते प्राचार्य रवींद्र पाटील या मान्यवरांच्या हस्ते गीत प्रदर्शन करण्यात आले.
हे गीत डोळ्यातून टपकणारे पाणी आणि नदीतील खळखळणारे पाणी यांची सांगड घालून प्रत्येकाला आपण बालपणात सोडलेल्या होड्या आठवतात… इतका जिवंतपणा या गाण्यात आहे, असे प्रतिपादन कवी सतीश सोळांळुककर यांनी केले. वऱ्हाडी आर्टसचे पहिले पाऊल पहिल्या गाण्याच्या रूपात नवरात्रीच्या काळात पडले आहे. सरस्वतीचा गोड आविष्कार गोड गाण्याच्या रूपात सर्वांना भावेल…कवितेला गाण्याचं स्वरूप प्राप्त झाल्याने कवी कुळातील सर्वांना याचा मनस्वी आनंद झाला आहे, अशा शब्दांत कवी अशोक बागवे यांनी कौतुकाची थाप वऱ्हाडी आर्टसला दिली.
प्रस्तुत गीताचे लेखन वैभव वऱ्हाडी यांनी केले असून योगेश मोरे, जयवर्धन सुर्यवंशी यांनी दिग्दर्शन केले आहे. गायन,संगीत, संयोजन ही बहुआयामी भूमिका योगेश मोरे यांनी पार पाडली आहे.बासरीच्या सुमधुर सुरांची भर तेजस पाटील यांनी घातली आहे. प्रस्तुत गाण्यात श्रृती गावडे, वैशाली वऱ्हाडी, वैभव वऱ्हाडी (कविता डॉट कॉमवाला) त्याचबरोबर बालकलाकार आराध्या गुरव आणि विराट पाटील यांनी सुंदर अभिनय करत गाण्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. या गीताच्या प्रदर्शनाप्रसंगी उपस्थित मान्यवरांसमवेत कविता डॉट कॉमचा कवी रुद्राक्ष पातारे आदी उपस्थित होते.