पुणे: सनई चौघड्यांचा मंगलमयी स्वर… लेझीम, ढोलताशांचा गजर… रांगोळ्या, पायघड्या, झब्बा-धोतर, नऊवारी साडी, फेटा असा मराठमोळा पेहराव केलेल्या अनेक मराठी कलाकारांच्या साथीने मोरया गोसावी मंदिरा पासून शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या नाट्य दिंडीला सुरूवात झाली. गांधी पेठ, तानाजी नगर मार्गे ही दिंडी श्री मोरया गोसावी क्रिडा संकुलापर्यंत पोहोचली.नाट्य कलावंतांसोबत पारंपारीक लोक कला असलेल्या वासुदेव, पिंगळा, पोतराज, गोंधळी, दशावतार या लोककलाकारांच्या लोककलेने ही नाट्य दिंडी सजली होती.
नाट्यदिंडीमध्ये अभिनेत्री कविता लाड, संदीप पाठक, अभिनेता सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, शुभांगी गोखले, तेजश्री प्रधान, सुरेखा कुडची, प्रतीक्षा लोणकर, कांचन अधिकारी, निर्मिती सावंत,अमृता सुभाष,प्रिया बेर्डे, वर्षा उसगावकर, स्पृहा जोशी, सुकन्या मोने, सविता मालपेकर तसेच सुशांत शेलार, चेतन दळवी, संजय मोने, वैभव मांगले, उमेश कामत, संजय खापरे, सुयश टिळक, पुष्कर श्रोत्री यांसह अनेक प्रसिद्ध कलावंत सहभागी झाले.