मुंबई: काही व्यक्ती अशा असतात कि त्यांना प्रत्येक गोष्ट ही संघर्ष केल्यानेच मिळते. त्यात पहिला नंबर म्हणजे सफाई कामगार. त्यांच्या दिवसाची सुरुवातच मुळात जगातील दुर्गंधी साफ करण्यासोबत होते. अशाच एका सफाई कामगाराचे आयुष्य रेखाटणाऱ्या ‘मोऱ्या’ चित्रपटाने चित्रपटातील नायकाप्रमाणेच ‘सेंसॉर प्रमाणपत्र’ मिळविण्यासाठी प्रदीर्घ संघर्ष केला आहे.
‘मोऱ्या’ची व्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समजताच त्यांनी सेंसॉर अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन समज दिली आणि त्यांनतर जवळपास तीन वर्ष सुरु असलेला हा प्रदीर्घ संघर्षाचा लढा संपून ‘मोऱ्या’ अखेर सेन्सॉरमुक्त झाला. ही लढाई सप्टेंबर २०२२ पासून सुरु होती, ती अखेर २७ फेब्रुवारी २०२४ ला संपुष्टात आली. यासाठी महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार हर्षल मळेकर यांनी बातमीच्या माध्यमातून याची दखल घेत या विषयाकडे लक्ष वेधले. तर मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात माई या राष्ट्रीय संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा ज्येष्ठ महिला पत्रकार शीतल करदेकर आणि मुख्यमंत्र्यांचे खाजगी जनसंपर्क अधिकारी विराज मुळे यांनी विशेष पाठपुरावा करून हे प्रकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी लक्ष घालून तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्याने अखेर ‘मोऱ्या’ सेंन्सॉरमुक्त मुक्त झाला.
‘टॉर्टुगा मोशन पिक्चर्स’ची निर्मिती असलेल्या या चित्रपटात एका सफाई कर्मचाऱ्यांची हृदयस्पर्शी कथा रेखाटण्यात आली असून ती अभिनेता जितेंद्र बर्डे यांनी आपल्या सहजसुंदर नैसर्गिक – संयमी अभिनयाने हुबेहूब उभी केली आहे. प्रमुख सहकलाकार उमेश जगताप, संजय भदाणे, धनश्री पाटील, राहुल रोकडे, सुरज अहिवळे, बालकलाकार रुद्रम बर्डे इत्यादींचा अभिनय आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कार मिळविणारा आणि सफाई कामगाराच्या जीवनावर बेतलेला ‘मोऱ्या’ आता येत्या २२ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवांत ‘उत्कृष्ट चित्रपटा’चा बहुमान मिळविणाऱ्या मोऱ्या चित्रपटगृहात जाऊन पहावा आणि मराठी अस्मिता जागवावी.