मुंबई:दिव्यांग मुलांसाठी विविध सामाजिक आणि विकासात्मक उपक्रम राबविणाऱ्या ‘नूतन गुळगुळे फाउंडेशन’तर्फे अर्नाळा येथे ‘स्वानंद सेवा सदन’ हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पातील तळ-मजल्यावर ‘श्री स्वामी समर्थांचे शक्तीस्थान व ध्यान धारणा केंद्र’ उभारण्यात आले असून कमळासनाधिष्ठित श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेचे व पादुकांची प्राणप्रतिष्ठापना तुंगारेश्वर पर्वतावरील प.पू. बालयोगी श्री सदानंद महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्रात ठेवण्यात आलेल्या स्वामी समर्थांच्या पादुका श्री दत्त दिगंबरांचे मूळ स्थान गाणगापूर, नरसोबाची वाडी आणि खुद्द अक्कलकोट या पवित्र दैवी स्थानांना स्पर्श करुन आणण्यात आल्या आहेत.
“आजी सोनियाचा दिनु वर्षे अमृताचा घनु – हरी पाहिलारे हरी पाहिलारे। या अभंगातील गर्भितार्थ आज आम्हा ‘नूतन गुळगुळे फाऊंडेशन’च्या आणि ‘तेंडूलकर परिवारा’च्या नशिबात स्वामी समर्थांच्या कृपेने आल्याने आजचा दिवस खरोखरच सोन्याचा झाला आहे. प.पू. बालयोगी सदानंद महाराज यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ शक्तीस्थान व ध्यानधारणा केंद्रातील तसबिरीची स्थापना व पादुकांची प्राणप्रतिष्ठा या सोहळ्यानिमित्त महाराजांचा अर्नाळ्याच्या भूमीला चरणस्पर्श झाल्याने खऱ्या अर्थानं या भूमीवर ‘अमृताचा पाऊस बरसला’ असे मला वाटते. नूतन गुळगुळे फाऊंडेशन सन्मानपूर्वक उभारत असलेल्या ‘दिव्यांग मुलांसाठीच्या ‘स्वानंद सेवा सदन’ या अत्याधुनिक सोईसुविधायुक्त सुसज्ज वसतिगृहाला त्यांचा शुभाशीर्वाद लाभला आहे. यासोबतच ‘स्वानंद सेवा सदनाची वास्तू साकारण्यास अर्नाळावासी अमरनाथ तेंडुलकर(काका) तसेच या वास्तूचा विकास व सुशोभीकरण हे आश्विनकुमार तेंडुलकर व बलराम वासन(बंटी भाऊ) यांचे विशेष योगदान लाभले आहे”. असे नूतन गुळगुळे फाऊंडेशनच्या अध्यक्षा नूतन गुळगुळे म्हणाल्या.
या निमित्त प्रतिक्रिया देताना संस्थेचे अर्थसल्लागार अमरनाथ तेंडूलकर म्हणाले, “या प्रकल्पासोबत मी सुरुवातीपासून जोडला गेलो आहे. अनंत अडचणींवर मात करीत गुळगुळे दांपत्य हा प्रकल्प तडीस नेण्यासाठी झटत होते. अर्नाळ्यासारख्या ठिकाणी असा ‘नॉनकमर्शियल’ प्रकल्प उभा राहणं हे आम्हासाठी भूषण म्हणता येईल, हा उदात्त हेतू पाहून तेंडूलकर परिवार गुळगुळे परिवाराच्या खांद्याला खांदा लावण्यास आल्याने लौकिकार्थाने आनंद होत आहे. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले होते, ‘दिव्यांग सेवा ही ईश्वर सेवा आहे’, ती करण्याचे भाग्य गुळगुळे परिवारासोबत आम्हाला मिळत आहे.”
रविवार दिनांक २६ मेला श्री श्री श्री शिवानंद सरस्वती महाराज (कवळे मठ – गोवा ) यांच्या हस्ते ‘स्वानंद सेवा सदन’ इमारतीतील पहिल्या मजल्याचे उदघाटन व कळस पूजन होणार असून या सोहळ्यास प्रमुख अतिथी हितेंद्र ठाकूर – आमदार, वसई विरार, प्रवीणा ठाकूर – माजी महापौर, सुनील देवधर – रा. सचिव, भा.ज.प., सीए. हिमांगी नाडकर्णी – अध्यक्षा, एनकेजीएसबी कॉ. बँक, सीए. संतोष केळकर – अध्यक्ष, जनकल्याण कॉ. बँक, किशोर रांगणेकर – संचालक, सारस्वत कॉ. बँक, विनायक प्रभू – टाइम्स ग्रुप, यांसह नंदकुमार घरत – सरपंच – अर्नाळा, अम्प्रपाली साळवे – इन. संचालक – कोचीन शिपयार्ड, आनंद पेजावर – व्य. संचालक – एसबीआय, पदाधिकारी – जी.एस.बी. टेम्पल ट्रस्ट वाळकेश्वर, सीए. सांतेश वर्टी – उपाध्यक्ष- एन.के.जी.एस.बी. बँक, किरण कामत – संचालक – एन.के. जी. एस. बी. बँक, किरण उमरुटकर – संचालक – सारस्वत कॉ. बँक, बिमलकुमार केडिया – अध्यक्ष – केशव सृष्टी – राष्ट्रीय स्वयंसेक संघ, श्री. दीपक घैसास – उद्योजक, विद्या सप्रे – दादर भगिनी समाज इत्यादी प्रभुतींची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
शुक्रवारी रात्री श्री स्वामी समर्थ महाराजांची तसबीर व पादुकांची भव्य मिरवणूक तेंडूलकर वाड्यातून प्रभात कॉलोनीपर्यंत काढण्यात आली होती, संपूर्ण अर्नाळकरांनी दसऱ्या दिवाळी सारख्या रांगोळ्या काढून या पालखीचे स्वागत केले होते.