मुंबई: गो, गो, गो गोविंदा…! बाल गोपाळांचा आनंदाने बागडण्याचा दिवस म्हणजे ‘गोपाळकाला’. सामान्य माणसांपासून ते आबालवृद्ध आणि कलाकारांपर्यंत सगळ्यांसाठीच दहीहंडीचा दिवस हा कल्ला करण्याचा असतो. आता ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘इंद्रायणी’ या मालिकेतही दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळणार आहे. सर्वांची लाडकी इंदू यंदा दहीहंडी फोडणार आहे.
‘इंद्रायणी’ मालिकेत श्रीकृष्ण जयंती आणि गोपाळकाला विशेष भागात इंदू आणि व्यंकू महाराजांचं कृष्णजन्म विशेष कीर्तन पार पडणार आहे. इंदूने कीर्तन केलेलं आनंदीबाई आणि विंझेला आवडत नाही. आता निरागस इंदूच्या प्रश्नांचं निरसन होणार का? हे मालिकेच्या आगामी भागांत कळेल.
इंदू आणि तिची फंट्या गँग जल्लोषात ‘गोपाळकाला’ साजरा करणार आहेत. विठुच्या वाडीत कीर्तन संपल्यानंतर होणाऱ्या दहीहंडीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. फंट्या गँग त्यांच्या पद्धतीने थर लावणार आहे. इंदू गोविंदा बनून दहीहंडी फोडणार आहे. एकंदरीतच ‘इंद्रायणी’ मालिकेच्या दहीहंडी विषेश भागात ड्रामा, जल्लोष असं सर्वकाही पाहायला मिळणार आहे.
इंद्रायणी मालिकेत इंदूचं पात्र साकारणारी सांची म्हणते,‘इंद्रायणी’ मालिकेच्या निमित्ताने आयुष्यात पहिल्यांदा मी दहीहंडी फोडली आहे. दहीहंडी फोडताना मला खरचं खूप मज्जा आली. सुरुवातीला मी घाबरले होते. पण नंतर मी मज्जा केली.”