‘पुन्हा एकदा चौरंग’ चित्रपटाचा टिझर आणि पोस्टर प्रदर्शित…

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीला ज्वलंत विषयावर वास्तवदर्शी चित्रपट बनवण्याची फार मोठी परंपरा आहे. आजवर अनेक चित्रपटांनी समाजातील दाहक विषय मोठया पडद्यावर मांडत समाजाला आरसा दाखवला आहे. याच वाटेवरील असलेला ‘पुन्हा एकदा चौरंग’ हा आगामी मराठी चित्रपट एका ज्वलंत विषयाला वाचा फोडणार आहे. ‘पुन्हा एकदा चौरंग’ या चित्रपटाचा टिझर आणि पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘आता मेणबत्ती नाही, होईल तो चौरंग’ असे म्हणत या चित्रपटाने जणू अन्यायाविरोधात एक लढाच पुकारला आहे.

आरोही फिल्म्सच्या बॅनरखाली निर्माते राजेंद्रकुमार गुलाबराव मोहिते आहेत. ज्योती राजेंद्रकुमार मोहीते सहनिर्मात्या आहेत. सागर दिनकरराव मोहिते यांनी दिग्दर्शनाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. ‘पुन्हा एकदा चौरंग’ हे शीर्षक खऱ्या अर्थाने चित्रपटाचा रंग दाखवणारे आहे. ही लढाई न्याय-अन्यायाची असल्याचे पोस्टर पाहिल्यावर सहजपणे जाणवते. ‘आता मेणबत्ती नाही…’ ही टॅगलाईन थेट ह्रदयाला भिडते. आज आपल्या आजूबाजूला जे घडत आहे ते भयानक आहे. स्त्रिया-तरुणी यांचे जगणे असह्य झाले आहे. दिवसागणिक स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. हे चित्र पाहिल्यावर हाच आपला पुढारलेला, सुधारलेला, महिलांना समान वागणूक देणारा समाज का? असा प्रश्न कोणत्याही सुजाण नागरिकाला पडल्याशिवाय राहणार नाही. कोलकाता, बदलापूरसारख्या ठिकाणी घडलेल्या घटना स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायचे प्रतीक आहेत. अशा असंख्य घटना आहेत ज्या कधी उजेडात आल्याच नाहीत. अशी कितीतरी प्रकरणे आहेत जी सत्ता आणि पैशाच्या बळावर दाबली गेली आहेत. ‘पुन्हा एकदा चौरंग’या चित्रपटाची कथाही अशाच प्रकारची आहे. सुप्रसिद्ध लेखक प्रताप गंगावणे यांनी या सिनेमाचं लेखन केलं असून त्यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले आहे. प्रताप गंगावणे यांनी आजवर बऱ्याच यशस्वी चित्रपटांचे लेखन केले असून ऐतिहासिक चित्रपटांचे लेखन करण्यात हातखंडा असलेल्या प्रताप गंगावणे यांना विविध मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. प्रदर्शित करण्यात आलेला टिझर खऱ्या अर्थाने ‘पुन्हा एकदा चौरंग’ची झलक दाखवणारा आहे.

दिग्दर्शक सागर दिनकरराव मोहिते म्हणाले की, ‘पुन्हा एकदा चौरंग’ हा चित्रपट रसिकांना विचार करायला लावणारा आहे. केवळ रसिकांचे मनोरंजन न करता त्याद्वारे एक सशक्त संदेश देण्याचे प्रयत्न करण्यात आला आहे. सशक्त कथानकाला नावाजलेल्या कलाकारांनी उत्तम न्याय देण्याचे काम केले आहे. आवश्यकतेनुसार सुरेल गीत-संगीताची जोडही देण्यात आली आहे. दर्जेदार निर्मितीमूल्ये असलेला ‘पुन्हा एकदा चौरंग’ नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी आशाही मोहिते यांनी व्यक्त केली.

‘पुन्हा एकदा चौरंग’मध्ये भूषण प्रधान आणि सौरभ गोखले हे दोन तगडे अभिनेते मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्या जोडीला अरुण नलावडे, जयवंत वाडकर, सिद्धी पाटणे, लतिका सावंत, महेश कोकाटे, दिव्येश मेदगे, नितीन कुलकर्णी, वंदना सरदेसाई, डॉ. विलास कुलकर्णी, मिलिंद दास्ताने, संतोष पाटील, राजभूषण सहस्त्रबुद्धे, बाळकृष्ण शिंदे, डॉ बाळासाहेब केंडके, पंकज काळे, पुष्पा कदम, प्रसाद दबके, नीरज राठोड, ओमकार बोथटे, प्रथमेश काटकर, अमोल जाधव, सतीश तांदळे, किशन राठोड, विलास कदम यांच्या जोडीला नवोदित अभिनेत्री सलोनी सातपुते, श्रद्धा नालिंदे, हर्षदा तोंडीलकर, प्रतीक्षा पगारे या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पाऊल ठेवणार आहेत. छायांकन अनिकेत करंजकर यांनी तर संकलन सुबोध नारकर यांनी केलं आहे. विरेंद्र केंजळे यांनी संगीत दिलं असून, विजय गावंडे यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. सिध्देश्वर नंदागवळे कार्यकारी निर्माता, तर नंदकुमार भगत लाईन प्रोड्यूसर आहेत. ध्वनिरेखन रमेश व्ही. इनामती यांनी केलं असून, केशव ठाकूर कला दिग्दर्शन केलं आहे. नृत्य दिग्दर्शन आहेत रौनक ओसवाल यांनी केलं असून, प्रशांत नाईक या चित्रपटाचे फाईट मास्टर आहेत. व्ही.एफ.एक्स मुन्ना निंबाळ यांचे असून वेशभूषा धनश्री साळेकर यांनी केली आहे.