मुंबई:’बिग बॉस मराठी’च्या १६ सदस्यांचा प्रवास फक्त एका ट्रॉफीसाठीचा होता. ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये आलेला प्रत्येक सदस्य जिंकण्याचे ध्येय घेऊन आला.सदस्य आणि प्रेक्षक सगळ्यांनाच माहिती होतं विजेता कोणी एकच असणार. संपूर्ण महाराष्ट्राने या सीझनला भरभरून प्रेम दिलं. घरातील प्रत्येक सदस्याने आपल्या पद्धतीने पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांची मने जिंकली. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये फक्त ‘बिग बॉस मराठी’ची चर्चा रंगत गेली. मग ती टास्कविषयी असो, घरात होणार्या राड्यांविषयी असो वा सदस्यांच्या दिवसागणिक बदलणार्या नात्यांविषयीची असो. ‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वाचा नुकताच दिमाखात महाअंतिम सोहळा पार पडला….आणि शेवटी तो क्षण आला ज्याची संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता. महाराष्ट्राला ‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वाचा विजेता मिळाला. महाराष्ट्राची मनं जिंकणारा सूरज चव्हाण ठरला ‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वाचा विजेता. तर अभिजीत सावंतने पटकावले दुसरे स्थान. सूरजला १४ लाख ६० हजार इतकी धनराशी मिळाली आणि मानाची ट्रॉफी. तसेच पु.ना.गाडगीळ आणि सन्स लिमिटेड तर्फे दहा लाखांचे विशेष गिफ्ट आणि Tunwal E Motors limited तर्फे बाईक. महाराष्ट्राच्या लाडक्या रितेश भाऊंनी विजेत्याची घोषणा केली आहे.
खेळाडूवृत्ती, मितभाषी, कोणाशी पंगा न घेणारा, प्रामाणिक, मातीशी जोडलेला गोलीगत सूरज चव्हाण नेहमीच चर्चेत राहिला. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री घेतल्यापासूनच त्याने स्वत:चं वेगळेपण दाखवलं. त्याने वाद घातले, राडे केले. पण त्याहीवेळी त्याने स्वत:ची बाजू उत्तम पद्धतीने राखली. प्रत्येक टास्क त्याने डोकं लावून खेळला म्हणूनच तो इथवर पोहोचला आणि या पर्वाचा विजेताही ठरला.
‘बिग बॉस मराठी’च्या या गाजलेल्या पर्वाचा महाविजेता सूरज चव्हाण म्हणाला, ‘हे सगळं स्वप्नवत आहे माझ्यासाठी… माझं स्वप्न पूर्ण झालं आहे. बिग बॉस मराठी’साठी विचारणा होताच मी लगेचच होकार दिला होता. या घराने मला अनेक गोष्टी शिकवल्या. एक चांगला माणूस बनण्याचा मी प्रयत्न केला. प्रेक्षकांना मी भावलो. रसिक प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच ‘बिग बॉस मराठी’चा मी महाविजेता ठरलोय. सर्वच प्रेक्षकांचे मनापासून खूप-खूप आभार. या मंचाने मला खूप काही दिलंय. मी आयुष्यभर प्रेक्षकांचा ऋणी राहीन’.
‘बिग बॉस मराठी’च्या महाअंतिम सोहळ्याला रितेश भाऊंनी ‘चार चाँद’ लावले. आपल्या धमाकेदार सादरीकरणाने त्यांनी ‘बिग बॉस मराठी’च्या भव्यदिव्य महाअंतिम सोहळ्याचा मंच दणाणून सोडला. गेले दोन आठवडे ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश भाऊंची कमतरता जाणवली होती. पण या महाअंतिम सोहळ्याला त्यांनी ही सर्व कसर भरून काढली. आपल्या हटके स्टाईलने त्यांनी महाअंतिम सोहळ्याची शोभा वाढवली.
‘बिग बॉस मराठी’च्या महाअंतिम सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. ‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वात सहभागी झालेले सर्व सदस्य या कार्यक्रमावेळी उपस्थित होते. सदस्यांच्या बहारदार नृत्यविष्काराने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन झालं. आता ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी उद्यापासून म्हणजेच ७ ऑक्टोबरपासून ‘लय आवडतेस तू मला’ ही नवी मालिका रात्री ९:३० वाजता आपल्या लाडक्या ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.