मुंबई: शैक्षणिक वर्ष २०२४-२५ केपी वेस्ट वार्ड अंतर्गत अंधेरी ते गोरेगाव पश्चिम यामधील सर्व माध्यमिक शाळांचे विज्ञान प्रदर्शन श्रीराम वेल्फेअर सोसायटी शाळा येथे ३,४ आणि ५ डिसेंबर २०२४ या तीन दिवसात आयोजित केले होते. यामध्ये उपनगर शिक्षण मंडळाच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी १७ बक्षिसे मिळवून स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. उपनगर शिक्षण मंडळ संचलित विद्यानिधी व्रजलाल पारेख मराठी माध्यमिक विभागाने उत्कृष्ट शाळा पुरस्कार पटकावला.
दिवंगत श्रीराम मंत्री यांनी वंचितांसाठी शिक्षण या हेतूने स्थापन केलेल्या विद्यानिधी व्हीपी मराठी माध्यमिक शाळेला यावर्षीचे केपी पश्चिम वॉर्डमधील सर्वोत्कृष्ट शाळेसाठीचे तिसरे पारितोषिक मिळाले आहे. वक्तृत्व, लोकनृत्य लहानगट, विज्ञान प्रकल्प, विज्ञान शैक्षणिक साहित्य यामध्ये मिळून ५ प्रथम पारितोषिके, शिक्षकांचे वक्तृत्व, लोकनृत्य.मोठागट यामध्ये द्वितीय पारितोषिके, चित्रकला तृतीय पारितोषिक आणि समूह गायन १ उत्तेजनार्थ पारितोषिक अशी एकत्र नऊ पारितोषिके शाळेने पटकावली आहेत.
परिस्थितीशी झगडत त्यातून जिद्दीने उभारण्याची स्वप्ने बघणाऱ्या मुलांना सामान्यतून असामान्यत्वाकडे नेण्याचा वसा या शाळेच्या समर्पित शिक्षक, सर्जनशील विद्यार्थी आणि खंबीर सहाय्यक संचालक मंडळ यांनी घेतला आहे. रोटरी क्लब हिड इंडिया, इनरव्हील क्लबसारख्या सामाजिक संस्था आणि पालकांचाही यात मोलाचा वाटा आहे. शाळेने अभ्यासाच्या बरोबर विज्ञान प्रकल्पांसारखे अभ्यासपूर्वक कार्यक्रम व नृत्य गायन यासारख्या सहशालेय कलांचा विकास यावर लक्ष केंद्रित केल्याने हा परिणाम दिसत आहे. शाळेच्या व्यवस्थापनाला विद्यार्थ्यांच्या यशाचा सार्थ अभिमान आहे. या भव्य यशाबद्दल विद्यार्थी, शिक्षक आणि व्यवस्थापनाचे अभिनंदन करण्यात येत आहे.