मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) वानखेडे स्टेडियमच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन १२ ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान करणार आहे. मुंबईचा अभिमान असलेल्या या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमचा ५०वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी जानेवारी २०२५ मध्ये खास कार्यक्रम होणार आहेत, असे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी वानखेडे स्टेडियम येथे आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केले. तसेच ५०व्या वर्धापनदिनाच्या विशेष लोगोचे अनावरण करण्यात आले. यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय नाईक, सचिव अभय हडप, सहसचिव दीपक पाटील आणि कोषाध्यक्ष अरमान मल्लिक, पदाधिकारी, सदस्य आदी उपस्थित होते. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी १९ जानेवारी रोजी वानखेडे स्टेडियमच्या समृद्ध वारशाचा सन्मान करण्यासाठी स्मृती टपाल तिकीट आणि एक कॉफी टेबल बुक प्रकाशित करणार असल्याचे सांगितले. या ऐतिहासिक स्टेडियमला सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि इतर दिग्गज क्रिकेटपटूंच्या खेळानं गौरव मिळाला आहे. एमसीए १९ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करणार आहे.
५०व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्याची सुरुवात १२ जानेवारी २०२५ ला होईल आणि १९ जानेवारी २०२५ ला वानखेडे स्टेडियममध्ये एका भव्य समारंभाने या कार्यक्रमांचा समारोप होईल. १९ जानेवारीला होणाऱ्या भव्य सोहळ्यात मुंबई आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील दिग्गज आजी-माजी क्रिकेटपटू एकत्र येतील. या विशेष कार्यक्रमात प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते आणि संगीतकार अजय-अतुल यांचे आकर्षक सादरीकरण आणि एक शानदार लेझर शो होईल. एमसीए १२ जानेवारीला एमसीए अधिकारी आणि वाणिज्य दूत, प्रशासक यांच्यात क्रिकेट सामना आयोजित करणार आहे. तसेच १५ जानेवारीला एमसीएच्या क्लब्स आणि मैदानांच्या ग्राउंड्समनसाठी विशेष भोजनाे आयोजन करण्यात येणार आहे, ज्याद्वारे मुंबई क्रिकेटच्या या अनामिक नायकांच्या योगदान आणि समर्पणाचा सन्मान केला जाईल.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सांगितले, ‘वानखेडे स्टेडियम हे राष्ट्राचा अभिमान आहे आणि त्याचा ५०वा वर्धापनदिन हा आमच्यासाठी ऐतिहासिक टप्पा आहे. हे स्टेडियम खेळाडू आणि चाहत्यांसाठी असंख्य अविस्मरणीय क्षणांचं साक्षीदार राहिलं आहे. आठवडाभर चालणाऱ्या उत्सव आणि भव्य समारोप कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही या स्टेडियमच्या समृद्ध क्रिकेट वारशाचा आणि गौरवशाली प्रवासाचा सन्मान करण्याचा प्रयत्न करत आहोत. क्रिकेटचा वारसा साजरा करणे हा एमसीएसाठी अभिमानाचा क्षण आहे आणि या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी संपूर्ण क्रिकेट समुदायाला एकत्र आणण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’