पीएनजी ज्वेलर्सची तिसऱ्या तिमाहीत चमकदार कामगिरी

मुंबई:हिरे आणि दागिने क्षेत्रातील कंपनी पीएनजी ज्वेलर्सने डिसेंबर तिमाहीत चमकदार कामगिरी साध्य केली असून कंपनीच्या एकत्रित महसुलात वार्षिक तत्वावर २४ टक्क्याने वाढ झाली आहे. दसरा, दिवाळी हे सण तसेच लग्नसराईचा मोसम यामुळे दागिन्यांच्या विक्रीत भरीव वाढ झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या रिटेल विभागाच्या विक्रीत ४२ टक्क्याने तर फ्रॅंचायजीची विभागाच्या विक्रीत ८७ टक्क्याने वाढ नोंदवली गेली आहे. याशिवाय ई कॉमर्सच्या माध्यमातून झालेल्या विक्रीत ९८ टक्क्याने वाढ झाली आहे. हिऱ्यांच्या दागिन्यांच्या विक्रीत वार्षिक तत्वावर ४० टक्क्याने वाढ झाली आहे. काही काळापूर्वी १२ नवीन स्टोअर्स उघडण्याची घोषणा कंपनीने केली होती. यातील ९ स्टोअर्स सुरु झाले असून उर्वरित दुकाने लवकरच सुरु केली जाणार आहेत. १८३२ ला स्थापन झालेला आणि पुणे येथे मुख्यालय असलेला पीएनजी ज्वेलर्स हा दागिन्यांचा देशातील आघाडीचा ब्रॅंड आहे.