अंध विद्यार्थ्याकरिता लिहिलेली ब्रेल लिपीमधील पुस्तके प्रकाशित…

नवी मुंबई: नवी मुंबईतील पत्रकार राजेंद्र घरत आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगर सचिव चित्रा बाविस्कर यांच्या अनुक्रमे रस आणि रसिक व मातीत ज्यांचे जन्म मळले तसेच जाम जेली आणि चॉकलेट व जगा स्वैर या ब्रेल लिपीतील पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक दिलीप गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. स्नेह ज्योती निवासी अंध विद्यालय, घराडी, मंडणगड, जिल्हा रत्नागिरी येथे १९ जानेवारी रोजी हा पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला.

स्नेह ज्योती अंध शाळेत मुलामुलींना शिक्षणाप्रमाणेच अन्य विद्यांमध्येही तरबेज करवून घेतले जात असल्याने आनंद झाल्याचे यावेळी गडकरी यांनी या दृष्टिहीन मुलामुलींनी सादर केलेली गाणी ऐकून नमूद केले आणि अशा चांगल्या संस्थांचे काम सर्वदूर पोहचवायला, येथे पुन्हा यायला आवडेल असे सांगितले. राजेंद्र घरत यांच्या सकारात्मक व समाजोपयोगी पत्रकारितेचे आपण साक्षीदार असून त्यांनी या संस्थेपर्यंत विविध व्यक्ती आणून त्यांना चांगला अनुभव देऊ केल्याचे सांगत या साऱ्या चांगल्या लोकांच्या सहकार्याने या अंधशाळेतील मुले राज्य व देशस्तराप्रमाणेच विश्वस्तरावरही गाजतील असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. नियतीने अन्याय केलेल्या या मुलामुलींवर मेहनत घेऊन ही अंधशाळा जणू इश्वरी कामच करीत असून यामुळेच आपले मराठीतील साहित्य ब्रेल लिपीमध्ये पुस्तकरुपाने आणणे, या शाळेमध्ये विविध नामांकितांना आणून त्यांना या कामाशी जोडून घेणे आपल्याला आवडते असे लेखक राजेंद्र घरत यांनी यावेळी आपल्या भाषणातून सांगितले. येथील संस्थाचालकांच्या कामाने आपण प्रभावित असून आपल्या पुस्तक प्रकाशनासाठी मुख्याध्यापिका प्रतिभा सेनगुप्ता यांचे अनमोल सहकार्य लाभणे यामुळे लेखनाला नवे आयाम मिळाल्याची भावना मांडून भविष्यात या शाळेतील विद्यार्थीनींच्या विवाहप्रसंगी कन्यादान करण्याची जबाबदारी घेणे आवडेल अशी इच्छा लेखिका चित्रा बाविस्कर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. या प्रसंगी स्नेह ज्योती संस्थेच्या अध्यक्ष आशा कामत, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सेनगुप्ता याही विचारमंचावर उपस्थित होत्या. सदर प्रसंगी येथील मुलामुलींसाठी नेलेला खाऊ, दैनंदिन उपयोगासाठी लागणाऱ्या चीजवस्तू, तांदुळ व अन्य सामान संस्थेकडे सोपवण्यात आले.