मुंबई:’सुलट प्रेमाची उलट गोष्ट’ ही अनोखी टॅगलाइन असलेला ‘मंगलाष्टका रिटर्न्स’ या चित्रपटात एक धमाल गोष्ट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा मनोरंजक टीजर लाँच करण्यात आला असून, त्यातून चित्रपटाची मजेशीर संकल्पना समजत आहे. उत्तम स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
वीर कुमार शहा यांनी निर्मिती केलेल्या मंगलाष्टका रिटर्न्स या चित्रपटाचं दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केलं आहे. डॉ. भालचंद्र यांनी कथा आणि संवादलेखन, पी. शंकरम यांनी संगीत दिग्दर्शन, विकास सिंह यांनी छायांकन, एस. विक्रमन यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात वृषभ शाह, शीतल अहिरराव ही नवी जोडी पाहायला मिळणार आहे. त्यांच्यासह प्रसाद ओक, आनंद इंगळे, सक्षम कुलकर्णी, सोनल पवार, कमलेश सावंत, सुनील गोडबोले, प्रसन्न केतकर, प्राजक्ता नवले, भक्ती चव्हाण, शीतल ओसवाल, श्वेता खरात, समीर पौलस्ते यांच्याही भूमिका आहेत.
आपल्याकडे थाटामात लग्न करण्याची पद्धत आहे. मात्र थाटामाटात घटस्फोट घेण्याची धमाल मनोरंजक गोष्ट मंगलाष्टका रिटर्न्स या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सुलट प्रेमाची उलट गोष्ट या टॅगलाइनमुळे या गोष्टीत काय काय ट्विस्ट अँड टर्न्स असणार याची उत्सुकता टीजरमुळे निर्माण झाली आहे. उत्तम कथानकाला खुमासदार विनोद, गाण्यांचाही तडका आहे. त्यामुळे हा चित्रपट सर्वांचं मनोरंजन करणारा असेल यात शंका नाही. म्हणूनच नेहमीपेक्षा एक वेगळी गोष्ट सांगणारा चित्रपट पाहण्यासाठी आता २३ मेपर्यंत वाट पहावी लागणार आहे.