मुंबई: वर्ष २०२५मध्ये प्रदर्शित होणाऱ्या आणि आधीपासूनच चर्चेत असलेल्या चित्रपटांमध्ये ‘चरक – फेअर ऑफ फेथ’ हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याच्या ठळक विषयवस्तू आणि गूढ, थरारक कथेमुळे प्रेक्षक आणि समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘द केरळा स्टोरी’सारखी ब्लॉकबस्टर देणारे सुदीप्तो सेन आता ‘सिपिंग टी सिनेमा’ या आपल्या नव्या बॅनरअंतर्गत पहिल्यांदाच निर्माता म्हणून पदार्पण करत आहेत. ही एक अनोखी, भारतीय लोककथा-आधारित हॉरर फिल्म आहे. नुकतीच बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये याची स्क्रीनिंग झाली असून त्याठिकाणी चित्रपटाला समीक्षकांकडून प्रचंड कौतुक मिळाले आहे. ‘चरक’ चित्रपटात पश्चिम बंगालच्या काही भागांमध्ये साजऱ्या होणाऱ्या चरक पूजेवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. भक्तीच्या नावाखाली होणाऱ्या अमानवी कृत्यांची आणि अंधश्रद्धेच्या अंधारात हरवलेल्या समाजाची ही गोष्ट आहे.
हा चित्रपट लोककथा शैलीत साकारला असून, अंधश्रद्धा, पिढ्यानपिढ्या चालत आलेली वेदना, आणि पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांच्या मौनाचा परिणाम या विषयांवर भाष्य करतो.