‘नाटकाचा तास’ प्रा. देवदत्त पाठक यांचे नवीन पुस्तक!

मुंबई: गुरुपौर्णिमेनिमित्त देवदत्त पाठक यांचे देवदत्त प्रकाशनच्या वतीने नवीन पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. बाल रंगभूमी कलेसाठी हे तर पुढचं पाऊल असेल. आता खेळा नाटकाच्या तासाच्या निमित्ताने नवीन ४०रंगमंचीय खेळ वयोगट पहिली ते चौथीसाठी खास करून क्षमता विकसन, कल्पना शक्ती, विचार शक्ती, निरीक्षण शक्ती, स्मरणशक्ती, कृती शक्ती, नैतिक मूल्य या व्यक्तिमत्वाला सशक्त करणाऱ्या क्षमतांचं हे नवीन पुस्तक आहे. आता मराठी, शास्त्र, इंग्लिश हिंदी, भूगोल, इतिहास याबरोबरच नाटकाचा तास हे पुस्तक मुलांना रंजक, प्रबोधक, आणि व्यक्तिमत्व आणि क्षमता विकसित करण्यासाठी उपयोगी पडले आहे , यामध्ये शिक्षकांना नाटकाचा तास कसा घ्यावा याचे सूक्ष्म मार्गदर्शनही करण्यात आले आहे.

४० रंगमंच खेळांच्या माध्यमातून संपूर्ण वर्षभर या नाटकाच्या तासाचे आयोजन शाळेला किंवा शैक्षणिक संस्थेला करता येईल, म्हणूनच वर्षाच्या सुरुवातीलाच या नाटकाच्या तासाचे पुस्तक सर्व शाळांमध्ये पोहोचवण्याचा प्रा. देवदत्त पाठक यांचा हा संकल्प आहे. भावभावना, धैर्य , उत्साह आणि क्रियाशीलता याची अगदी शाळेच्या वर्गात, मैदानावर, तसेच घरीही तो वाढवण्यासाठी या पुस्तकाची मदतच होणार आहे. मुलांच्या मागण्या आणि त्याला पुरे करणारे पालक, यामध्ये फक्त मटेरियाली स्टिक देवाण-घेवाण आजकाल होताना दिसते. तू मार्क मिळव मी तुला हे देतो, मी तुला हे दिलं. तर तू ते करून दाखव अशा पद्धतीच्या असलेल्या सध्याच्या विचार आणि कृतीने आजची मुले आत्मीयता आणि मायेचा ओलावा विसरत चालले आहेत की काय ? अशी शंका विचारवंत तज्ञ यांना निश्चितच पडली असेल.

म्हणूनच केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मदत करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या तज्ञांकडून प्रेरित विचार मुलांसाठी एनइपीद्वारे (NEP) मागवले जात आहेत. त्यामधील रंगभूमी कला हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा एक विचार आहे . ज्यामध्ये अनेक कलांमध्ये नाट्यकला याचा विचार आता जाणीवपूर्वक करण्यात आला आहे. या नाटकाच्या तासाच्या पुस्तकात पहिली ते चौथीची मुले यांना समोर ठेवूनच, त्यांच्या व्यक्त होण्यासाठी असलेल्या त्यांच्याकडच्या क्षमतांना कशा पद्धतीने सशक्त (ब्राईट) करता येईल, यासाठी ४० खेळांचा नव्याने अंतर्भाव केलेला आहे.

जिथे जिथे मुले आहेत तिथे तिथे रंगभूमी कला असली पाहिजे,आणि जिथे जिथे रंगभूमी कला आहे तिथे तिथे निर्दोष सुसंवाद होतोच, या विचाराने रंगभूमी रंगमंचीय धड्यांमधून मुलांपर्यंत पोहोचणार आहे. आठवड्यातून दोन वेळा किंवा वर्षातून ४० वेळेला या पद्धतीने मुलांना एकत्रित आणून त्यांच्याकडून नाट्यकलेचे रंगमंचीय खेळांचे धडे दिले जाणार आहेत. मुलं एकत्र येतील, खेळतील ,बागडतील ,विचार करतील, स्वतःच्या कल्पना मांडतील आणि त्यावरती कृती करूनही दाखवतील. आणि आपण जी कृती केली आहे त्यावरती एकमेकांच्या मदतीने त्यावर चर्चाही करतील छोटीशी परीक्षाही देतील. अशा प्रकारचं आयोजन या नाटकाच्या
तासाच्या पुस्तकात केले आहेत. बाल गट म्हणजेच पहिली ते चौथी याबरोबरच, कुमार गट आणि किशोर गट यासाठी ही पुढची दोन पुस्तके देवदत्त प्रकाशनद्वारे देवदत्त पाठक तयार करीत आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात याचा उपयोग होईलच पण ज्यांना स्वतंत्रपणे अशा पद्धतीचे अशा पद्धतीचे तास वेळापत्रकात तास ठेवायचे आहेत, त्यांना एक अभ्यासक्रम म्हणून या पुस्तकाचा निश्चितच उपयोग होईल,असे या निमित्ताने बाल रंगभूमी कला तज्ञ देवदत्त पाठक यांनी व्यक्त केले आहेत. देवदत्त प्रकाशनचे हे विसावे पुस्तक मिलिंद केळकर आणि दीपिका पाठक यांच्या सहकार्याने प्रत्यक्षात येत आहे. गुरुपौर्णिमेला या नवीन विषयावरचे पुस्तक रुपी ज्ञान मुलांपर्यंत पोहोचावे यासाठी नाटकाच्या तासाचे हे पुस्तक एक ज्ञानदान म्हणून सर्वांपर्यंत पोहोचत आहे.